टेनिसजगतात खेळल्या जाणाऱ्या वर्षातील चार ग्रँडस्लॅमपैकी दुसरी ग्रँडस्लॅम फ्रेंच ओपन अंतिम टप्प्याकडे मार्गक्रमण करू लागली आहे. स्पर्धेचे पुरुष गटातील उपांत्यपूर्व फेरीचे सामने पार पडले असून, प्रथम मानांकित सर्बियाच्या नोवाक जोकोविच व लाल मातीच्या बादशहा म्हणून ओळखला जाणारा स्पेनचा राफेल नदाल यांनी आपापले सामने जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला. आता या दोघांमध्ये उपांत्य फेरीचा सामना खेळला जाईल. चार ग्रँडस्लॅमपैकी ही एकमेव स्पर्धा मातीच्या कोर्टवर खेळली जाते.
नदाल व जोकोविचचे विजय
फ्रेंच ओपन २०२१ मध्ये प्रथम मानांकित असलेला सर्बियाचा नोवाक जोकोविच याने उपांत्यपूर्व फेरीत नवव्या मानांकित मॅटिओ बेर्रेटीनीचा ६-३, ६-२, ६-७ (५), ७-५ असा पराभव केला. सामन्यानंतर बोलताना जोकोविच म्हणाला, “हा एक अतिशय कठीण सामना होता. मी संपूर्ण वेळ तणावात होतो.”
दुसरीकडे फ्रेंच ओपनचा बादशहा म्हटल्या जाणाऱ्या राफेल नदाल याने उपांत्यपूर्व फेरीत दहाव्या मानांकित अर्जेंटिनाच्या डिएगो श्वार्टझमनचा ६-३, ४-६, ६-४, ६-० असा पराभव केला. नदाल याची फ्रेंच ओपनमधील आतापर्यंतची कामगिरी १०५ विजय व २ पराभव अशी आहे.
नदालचे पारडे जड
राफेल नदाल याने आतापर्यंत विक्रमी १३ वेळा फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकावले आहे. या उपांत्य सामन्यात खेळताना नदाल आणि जोकोविच ५८ व्या वेळी आमनेसामने येतील. जोकोविच सध्या २९-२८ असा आघाडीवर आहे. मात्र, नदाल ग्रँडस्लॅममध्ये जोकोविचविरुद्ध १०-६ आणि फ्रेंच ओपनमध्ये ७-१ अशा फरकाने पुढे दिसतो.
पुरुष गटातील दुसरी उपांत्य फेरीची लढत पाचव्या मानांकित स्टेफॅनोस त्सित्सिपास व सहाव्या मानांकित ऍलेक्झांडर झ्वेरेव यांच्यात होईल. स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर याने तिसऱ्या फेरीनंतर वैयक्तिक कारणाने स्पर्धेतून माघार घेतली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
फ्रेंच ओपन: झ्वेरेव आणि त्सित्सिपासचा अंतिम ४ जणांमध्ये प्रवेश; उपांत्य सामन्यात येणार आमने-सामने
महत्त्वाची बातमी! दिग्गज रॉजर फेडररची फ्रेंच ओपनमधून माघार; दिले ‘हे’ कारण