जपानची दिग्गज टेनिसपटू नाओमी ओसाकाने सोमवार धक्कादायक निर्णय घेतला. सध्या सुरू असलेल्या फ्रेंच ओपनची पहिली फेरी जिंकून तिने दुसर्या फेरीत प्रवेश केला होता. मात्र या स्पर्धेत पुढे खेळण्यासाठी इन्कार करत तिने या प्रतिष्ठित ग्रँड स्लॅम स्पर्धेतून माघार घेत असल्याची घोषणा केली. या वृत्ताने टेनिस जगतात खळबळ उडाली असून ओसाकावर आगामी काळात गंभीर कारवाई केली जाईल, अशीही शक्यता आता वर्तवली जात आहे.
जपानच्या २३ वर्षीय नाओमी ओसाकाने फ्रेंच ओपनच्या पहिल्या फेरीत रोमानियाच्या पॅट्रिका मारीयाला पराभूत करत स्पर्धेची शानदार सुरुवात केली होती. एक तास ४७ मिनिटे चाललेल्या या सामन्यात तिने ६-४, ७-६(४) अशा सरळ सेट्समध्ये विजय मिळवला होता. या विजयानंतर जागतिक क्रमवारीत दुसर्या स्थानावर असलेली नाओमी ओसाका फॉर्मात असल्याचे संकेत मिळत होते. मात्र या सामन्यानंतर तिने माध्यमांशी बोलायला नकार दिला आणि वादाला तोंड फुटले.
नाओमी ओसाकाने ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच घोषणा केली होती की मानसिक आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने ती कुठल्याही पत्रकार परिषदेत भाग घेणार नाही. यासाठी आयोजकांनी दंड ठोठावला तरी आपल्याला त्याची पर्वा नसल्याचे विधान तिने केले होते. याच विधानावर ठाम राहत तिने पहिल्या फेरीच्या सामन्यानंतर देखील पत्रकारांशी आणि माध्यमांशी संवाद साधायला नकार दिला. परंतु, हे स्पर्धेच्या नियमांचे उल्लंघन असल्याने आयोजकांनी ओसाकाला जबर रकमेचा दंड ठोठावला. जवळपास १५ हजार डॉलर (११ लाख रुपये) इतका दंड तिला भरावा लागला.
यानंतर नाओमी ओसाकाने थेट स्पर्धेतूनच माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला. ती म्हणाली, “मी नैसर्गिक सार्वजनिक वक्ता नाही. संपूर्ण दुनियेतील माध्यमांशी बोलतांना मला घाबरायला होते. मी जवळपास २०१८ सालच्या अमेरिकन ओपन स्पर्धेपासून मानसिक तणावाचा सामना करते आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी मला खूप अडचणींचा सामना करावा लागला. पॅरिस मध्ये मला आधीपासूनच असुरक्षित आणि तणावपूर्ण वाटत होते. त्यामुळे मी स्वतःच्या भल्यासाठी पत्रकार परिषद टाळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच आता मी स्पर्धेतून देखील माघार घेते आहे. आता सगळे केवळ टेनिसवर लक्ष केंद्रित करू शकतील.”
— NaomiOsaka大坂なおみ (@naomiosaka) May 31, 2021
मात्र नाओमी ओसाकाच्या या निर्णयाचे दूरगामी पडसाद उमटण्याची शक्यता आहे. चारही ग्रँड स्लॅम आयोजकांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात नाओमीवर भविष्यात ग्रँड स्लॅम स्पर्धेतून निलंबित होण्याची कारवाई होऊ शकते, असे सूचित करण्यात आले आहे. याशिवाय मोठ्या रकमेचा दंड देखील तिला चुकवावा लागू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात भुवनेश्वर कुमारची जागा घेऊ शकतात हे ३ गोलंदाज
WTC फायनल: ‘रोहित खेळला तर द्विशतक करुनचं शांत बसेल,’ दिग्गजाला आहे विश्वास
इंग्लंड सरकारचा मोठा निर्णय, दौर्यावर येणार्या भारतीय खेळाडूंना दिली ‘ही’ सूट