कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्व देशातील क्रिकेट संघटनांनी बायोबबलचे नियम अधिक कडक केलेले आहेत. या बायोबबलचे पालन करणे हे प्रत्येक क्रिकेटपटूचे कर्तव्य मानले जाते. खेळाडूंनी यासंदर्भात हलगर्जी बाळगल्यास त्याचे किमंतही चूकवावी लागत आहे. अशाच एका चुकीमुळे 18 वर्षीय नसीम शाहला मोठी स्पर्धेला मुकावे लागणार आहे.
नुकतेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांचा वेगवान गोलंदाज नसीम शाहला कोरोना व्हायरस संसर्ग टाळण्यासाठी बनविलेल्या बायोबबलच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे पीएसएल 2021 चे उर्वरित सामने आयोजित करण्यापूर्वीच स्पर्धेतून निलंबित केले आहे.
जूनच्या सुरूवातीस पाकिस्तान सुपर लीगचे उर्वरित 20 सामने युएईमध्ये होणार आहेत. तथापि, पीसीबीला या कार्यक्रमापूर्वी युएई प्रशासनाकडून पूर्ण मान्यता मिळालेली नाही. एका वृत्तानुसार, नसीम शाहने लाहोरमधील एका हॉटेलमध्ये संघात सामील होण्यापूर्वी जुना आरटी-पीसीआर अहवाल दाखवून प्रवेश मिळविला होता.
पीसीबीने नसीम शाहने दाखविलेल्या या हलगर्जीपणामुळे त्याच्यावर कठोर कारवाई करत त्याला पीएसएलच्या यंदाच्या मोसमातून बाहेर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तो यापुढे संपूर्ण स्पर्धेत खेळू शकणार नाही. नसीम शाह पीएसएलमध्ये सरफराज अहमद याच्या नेतृत्वात कोटा ग्लेडिएटर्स संघाचा स्टार खेळाडू होता.
पीसीबीचे संचालक बाबर हमीद यांनी निवेदन जारी केले आहे की, “नसीम शाहला स्पर्धेतून बाहेर करताना आम्हाला आनंद होत नाही. पण जर अशा बाबींकडे दुर्लक्ष केले तर भविष्यात संपूर्ण स्पर्धा देखील धोक्यात येऊ शकते. ”
नसीम शाहा पाकिस्तानचा उगवता स्टार खेळाडू आहे. तो पाकिस्तानच्या कसोटी व टी20 संघात नियमितपणे खेळत असतो. आगामी काळात नसीम शाहचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बोलबाला असेल, असे मत अनेक क्रिकेट पंडितांनी मांडलेले आहे. नसीमने पाकिस्तानकडून 9 कसोटी व 12 टी20 सामने खेळलेले आहेत. 9 कसोटी सामन्यात त्याने 42. 50 च्या सरासरीने 20 बळी मिळवलेले आहेत. तसेच त्याने 12 टी-20 सामन्यात 36 च्या सरासरीने 10 बळी मिळवलेले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
श्रीलंकेविरुद्ध शतक झळकवत मुशफिकुर रहीमचा खास पराक्रम, दिग्गजांच्या यादीत मिळवले स्थान
स्टीव्ह स्मिथ आता बनणार नाही ऑस्ट्रेलियाचा कर्णधार? दिग्गज क्रिकेटपटूने दिले ‘हे’ उत्तर
मुंबई क्रिकेट संघाला नव्या महागुरूचा शोध; रणजी क्रिकेट गाजवणारे शिलेदार शर्यतीत