नाशिक: नाशिक सायकलीस्ट फाउंडेशन आयोजित शेगाव सायकल यात्रेत 100 हून अधिक सायकलप्रेमींनी सहभाग नोंदवत केवळ तीन दिवसात 14 ते 16 डिसेंबर दरम्यान तब्बल 417 किमी अंतराची नाशिक-शेगाव यात्रा पूर्ण केली आहे. शेगाव सायकल यात्रेचे हे सलग दुसरे वर्ष असून डॉ. आबा पाटील यांनी या यात्रेची संपूर्ण जबाबदारी पेलली. पर्यावरण संवर्धनाला अध्यात्मिकतेची जोड देण्याचा याद्वारे प्रयत्न असून नाशिक सायकलिस्टस आता दरवर्षी पंढरपूर सायकल वारीसह शेगाव यात्रेचेही यशस्वी आयोजन करणार आहे.
2017 साली डॉ. आबा पाटील व अवघ्या 12, 15 लोकांनी शेगाव वारी सुरू केली. त्याअगोदर योगेश शिंदे आणि मित्र परिवार, जल्लोष ग्रुप, मुक्त विद्यापीठ परिवार शेगाव सायकल प्रवास करून आलेला होता. त्यातूनच या शेगाव यात्रेची संकल्पना पुढे आली. आणि यावर्षाच्या रॅलीत 8 वर्षांपासून ते 73 वर्षांपर्यंतचे तब्बल 100 हून अधिक महिला आणि पुरुष सायकलप्रेमी सहभागी झाले होते.
शुक्रवारी (दि.14) गंगापूर नाका येथून नाशिक सायक्लिस्टस् फाऊंडेशन अध्यक्ष प्रविणकुमार खाबिया, उपाध्यक्ष राजेंद्र वानखेडे, व पॉवर डेअरी चे भगवान सानप या मान्यवरांच्या हस्ते ध्वज दाखवून या यात्रेची सुरुवात झाली. पुढे पिंपळगाव-वडाळीभोई – चांदवड – सौंदाणे – मालेगाव – धुळे असा 160 किमीचा प्रवास पूर्ण केला.
शनिवारी (दि. 15) सकाळी 5 वाजता स्ट्रेचींग, योगा केल्यानंतर पुढचा प्रवास सुरु झाला. पुढे एरंडोल – जळगाव – फुलगांव असा 130 किमीचा प्रवास पूर्ण झाला.
रस्ता खराब अन प्रचंड वाहतूक कोंडीमुळे वेळ झाला.
रविवारी (दि.16) पहाटे 5.30 वाजता यात्रेच्या अखेरच्या दिवशी मुक्ताईनगर – मलकापुर – नांदुरा असे करत अखेरीस तब्बल 417 किमी अंतर पार करून नाशिक सायकलीस्ट शेगावला पोहचले.
मध्यात एकनाथ खडसे उर्फ नाथाभाऊ यांच्या निवासस्थानी सायकलीस्टने त्यांची भेट घेतली. त्यांनी शेगाव सायकल यात्रेचे कौतुक केले. नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रविणकुमार खाबीया व शेगाव वारीचे नियोजनकर्ता डॉ. आबा पाटील, रामभाऊ लोणारे, राजाभाऊ कोटमे, हेमंत अपसुंदे किशोर आणि भाउसाहेब काळे डॉ शिरीष राजे,संजय पवार सायकलिस्टचे सदस्य व परिवार यांनी या वारीसाठी प्रयत्न केले.