ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाचा कसोटी क्रिकेटमध्ये सामना करणे ही सोपी गोष्ट नाहीये. मात्र, 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला चारी मुंड्या चीत केले. असे असले, तरीही इंदोर कसोटी सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघर्ष करावा लागला. ऑस्ट्रेलियाच्या अनुभवी गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना घाम फोडत विक्रमांचे मनोरे रचले. त्या गोलंदाजांमध्ये फिरकीपटू नेथन लायन याच्या नावाचाही समावेश होतो. लायनने भारताविरुद्धच्या दुसऱ्या डावात सर्वाधिक विकेट्स घेत बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमधील आतापर्यंतची तिसरी सर्वोत्तम गोलंदाजी केली.
नेथन लायनची कामगिरी
झाले असे की, भारतीय संघ दुसऱ्या डावात फलंदाजी करत होता. यावेळी भारताची सुरुवात खूपच खराब झाली. शुबमन गिल (5) याच्या रूपात भारताने 15 धावांवर आपली पहिली विकेट गमावली. त्यानंतर नियमित अंतराने विकेट्स पडत राहिल्या. एकेवेळी भारताची धावसंख्या 4 विकेट्स गमावत 78 इतकी होती. त्यानंतर श्रेयस अय्यरने जोरदार फटकेबाजी करण्यास सुरुवात करत धावसंख्या शंभरच्या पार नेली. परंतु तो जास्त वेळ टिकू शकला नाही. एका बाजूने चेतेश्वर पुजारा जोरदार फटकेबाजी करत होता. त्याने यादरम्यान 142 चेंडूंचा सामना करत 59 धावा चोपल्या आणि अर्धशतक पूर्ण केले. मात्र, तोही पुढे बाद झाला. अय्यर (26) आणि पुजारा (59) यांना सोडले, तर इतर कुणीही 20 धावांचा आकडा पार केला नाही. अशाप्रकारे भारताने सर्व विकेट्स गमावत 163 धावा केल्या. यातील 8 विकेट्स एकट्या नेथन लायन याने घेतल्या.
Nathan Lyon took his second eight-wicket haul in India as the visitors edged close to a famous win in Indore 😯
Report 👇#INDvAUS | #WTC23https://t.co/l70F1lQDVv
— ICC (@ICC) March 2, 2023
नेथन लायन (Nathan Lyon) याने वरच्या फळीतील चारपैकी तीन फलंदाजांना बाद केले. त्याने रोहित शर्मा (12), विराट कोहली (13) आणि रवींद्र जडेजा (7) यांची विकेट काढली होती. त्यानंतर त्याने केएस भरत (3), आर अश्विन (16), पुजारा (59), उमेश यादव (0) आणि मोहम्मद सिराज (0) यांची विकेट काढली. यावेळी त्याने 22.3 षटके गोलंदाजी करताना 64 धावा खर्च करत 8 विकेट्स नावावर केल्या. यासह त्याच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली. तो बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) कसोटीत सर्वोत्तम गोलंदाजी करणारा तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला.
यादीत एकमेव ऑस्ट्रेलियन
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत सर्वोत्तम गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूंमध्ये अव्वलस्थानी भारतीय गोलंदाज जसूभाई पटेल आहेत. त्यांनी 1959मध्ये 69 धावा खर्च करत 9 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या स्थानी नेथनच असून त्याने 2017मध्ये 50 धावा खर्च करत 8 विकेट्स घेतल्या होत्या. चौथ्या स्थानी भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग आहे. त्याने 2001मध्ये 84 धावा खर्च करत 8 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच, पाचव्या स्थानी कपिल देव असून त्यांनी 1985मध्ये 106 धावा खर्च करत 8 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. विशेष म्हणजे, या यादीत तीन खेळाडू भारतीय, तर नेथन एकमेव ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत सर्वोत्तम गोलंदाजी करणारे खेळाडू
9/69 – जसूभाई पटेल (भारत,1959)
8/50 – नेथन लायन (ऑस्ट्रेलिया, 2017)
8/64 – नेथन लायन (ऑस्ट्रेलिया, 2023)*
8/84 – हरभजन सिंग (भारत, 2001)
8/106 – कपिल देव (भारत, 1985)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताच्या सध्याच्या प्लेइंग इलेव्हमधील ‘या’ पठ्ठ्याला सोडून लायनने सर्वांची केलीय शिकार, यादी पाहाच
इंदोर कसोटीवर ऑस्ट्रेलियाची घट्ट पकड! भारतीय फलंदाजी पुन्हा फेल, ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 76 धावांचे लक्ष्य