---Advertisement---

मलानची विकेट घेताच लायनची ३ मोठ्या विक्रमांना गवसणी; अश्विन, मुरलीधरनच्या पंक्तीत स्थान

On: शनिवार, डिसेंबर 11, 2021 10:17 AM
Nathan-Lyon
---Advertisement---

ब्रिस्बेन। ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड संघात द गॅबा स्टेडियमवर पहिला ऍशेस कसोटी सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ९ विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने ५ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे. ऑस्ट्रेलियाच्या या विजयात ऑफ स्पिनर नॅथन लायन याचाही मोठा वाटा राहिला. याबरोबरच त्याने या सामन्यादरम्यान मोठा विक्रम देखील केला आहे.

लायनच्या ४०० विकेट्स 
या सामन्यापूर्वी नॅथन लायनच्या नावावर ३९९ कसोटी विकेट्स होत्या. पण, या सामन्यात त्याला पहिल्या डावात एकही विकेट घेता न आल्याने त्याची ४०० कसोटी विकेट्सची प्रतिक्षा लांबली होती. अखेर दुसऱ्या डावात त्याने डेविड मलानला ८२ धावांवर बाद केले आणि ४०० वी विकेट घेतली. याबरोबरोबरच तो कसोटी क्रिकेटमध्ये ४०० विकेट्सचा टप्पा पार करणारा जगातील १७ वा गोलंदाज ठरला. 

तसेच ४०० कसोटी विकेट्सचा टप्पा पार करणारा लायन केवळ चौथाच ऑफ स्पिनर ठरला. यापूर्वी मुथय्या मुरलीधनर, आर अश्विन आणि हरभजन सिंग या तीन ऑफ स्पिनरलाच ४०० कसोटी विकेट्सचा टप्पा पार करता आला होता. 

लायनने ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात ९१ धावांत ४ विकेट्स घेतल्या. त्यामुळे आता त्याच्या विकेट्सची संख्या १०१ कसोटी सामन्यांत ४०३ विकेट्स अशी झाली आहे.

कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारे ऑफ स्पिनर
८०० – मुथय्या मुरलीधरन (१३३ सामने)
४२७ – आर अश्विन (८१ सामने)
४१७ – हरभजन सिंग (१०३ सामने)
४०३ – नॅथन लायन (१०१ सामने)
३०९ – लान्स गिब्स (७९ सामने)

https://twitter.com/ICC/status/1469453951837814788

लायन असा पराक्रम करणारा दुसराच 
नॅथन लायनने या सामन्यात ४०० विकेट्सचा टप्पा पार केल्याने त्याने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. लायनने त्याच्या कसोटी कारकिर्दीत ४०० विकेट्सबरोबरच १११६ धावा देखील केल्या आहेत, तसेच क्षेत्ररक्षण करताना ५० झेल देखील घेतले आहेत.

त्यामुळे तो कसोटीमध्ये ४०० पेक्षा अधिक विकेट्स, १००० पेक्षा अधिक धावा आणि ५० किंवा त्यापेक्षा अधिक झेल घेणारा मुथय्या मुरलीधरननंतरचा दुसराच ऑफ स्पिनर ठरला आहे. मुरलीधरनने कसोटीत ८०० विकेट्स घेण्याबरोबरच १२६१ धावा केल्या आहेत आणि ७२ झेल घेतले आहेत.

ऑस्ट्रेलियाचा तिसराच गोलंदाज
याशिवाय लायन हा कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाकडून ४०० हून अधिक विकेट्स घेणारा केवळ तिसराच गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी शेन वॉर्न (७०८) आणि ग्लेन मॅकग्रा (५६३) यांनी हा कारनामा केला आहे.

https://twitter.com/CricketAus/status/1469453856652226562

ऑस्ट्रेलियाने मिळवला विजय 
या सामन्यात इंग्लंडला ऑस्ट्रेलियासमोर केवळ २० धावांचे आव्हान ठेवता आले होते. या आव्हानाचा पाठलाग ऑस्ट्रेलियाने ५.१ षटकात सहज पूर्ण केला. इंग्लंडचा दुसरा डाव १०३ षटकात २९७ धावांवर आटोपला. इंग्लंडने पहिल्या डावातील २७८ धावांच्या पिछाडीमुळे ऑस्ट्रेलियाला केवळ २० धावांचे लक्ष्य दिले होते. ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात लायनने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.

तत्पूर्वी इंग्लंडचा पहिला डाव १४७ धावांत आटोपला होता, तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४२५ धावा करत २७८ धावांची आघाडी घेतली होती.

महत्त्वाच्या बातम्या – 

पहिल्या ऍशेस सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून इंग्लंड चारीमुंड्या चीत! यजमानांचा ९ विकेट्सने दणदणीत विजय

वनडे कर्णधार म्हणून हिटच आहे रोहित; आकडे देतायेत ग्वाही

कपिल देव यांना भारतरत्न देण्याची मागणी; माजी खेळाडूने घेतला पुरस्कार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---