मागील आठवड्यात भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरुन मायदेशी परतला. हा ऑस्ट्रेलिया दौरा अनेक अर्थांनी भारतीय संघासाठी अविस्मरणीय ठरला. त्यातही ब्रिस्बेन येथे कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाने खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवत १०० वा कसोटी सामना खेळणाऱ्या नॅथन लायनला जर्सी भेट दिली होती. आता याबद्दल नॅथन लायनने आभार मानले आहेत.
ब्रिस्बेन येथे १५ ते १९ जानेवारीदरम्यान खेळला गेलेला कसोटी सामना हा लायनचा कारकिर्दीतील १०० वा कसोटी सामना होता. त्यामुळे भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेने भारतीय खेळाडूंनी स्वाक्षरी केलेली भारतीय संघाची जर्सी लायनला सामना संपल्यानंतर भेट दिली होती.
यानंतर एक आठवड्याने लायनने १०० व्या कसोटीबद्दल आपल्या भावना व्यक्त करणारी एक पोस्ट लिहिली आहे. यात त्याने ऑस्ट्रेलियाच्या संघाने त्याला दिलेल्या गार्ड ऑफ ऑनरचा आणि भारतीय संघाने दिलेल्या जर्सीचा फोटो शेअर केले आहेत.
त्याचबरोबर त्याने लिहिले आहे की ‘घरी आल्यानंतर एक आठवड्याने मला या उन्हाळ्यातील क्रिकेटबद्दल व्यक्त होण्याची संधी मिळाली आहे. ऑस्ट्रेलियासाठी खेळणे आणि बॅगी ग्रीन टोपी मिळवणे माझ्यासाठी नेहमीच एक स्वप्न होते. मी १०० कसोटी सामने खेळण्याबद्दल कृतज्ञ आहे.’
त्याने पुढे लिहिले, ‘ऑस्ट्रेलियन दिग्गजांबरोबर मला खेळण्याची आणि त्यांच्याकडून शिकण्याची संधी मिळाली. माझे या दरम्यान अनेकांशी मैत्रीचे संबंध निर्माण झाले, जे आयुष्यभर राहतील. ब्रिस्बेन येथे १०० वा कसोटी सामना खेळण्याची संधी मला मिळाली याचा मला वैयक्तिकरित्या फार अभिमान वाटत आहे. जरी त्या सामन्यात आम्हाला योग्य कामगिरी करता आली नसली तरी शिकणे आणि प्रगती करणे सुरुच रहाणार आहे. प्रत्येकदिवशी एक सर्वोत्तम क्रिकेटपटू बनण्याचे ध्येय आहे.’
याबरोबरच भारतीय संघाचे आभार मानताना लायनने लिहिले, ‘अजिंक्य रहाणे आणि भारतीय संघाचे मालिका जिंकल्याबद्दल अभिनंदन. तसेच तुम्ही दाखवलेल्या खिलाडूवृत्तीबद्दल आणि मला भेट दिलेल्या भारतीय संघाच्या टी-शर्टबद्दल आभार. माझ्या संग्रहातील ही विशेष गोष्ट असेल.’
https://www.instagram.com/p/CKh6OyeDmhX/
याबरोबरच लायनने म्हटले की आता आणखी मोठे ध्येय गाठण्याची आणि पुन्हा सुरुवात करण्याची वेळ आहे.
लायनने त्याच्या कारकिर्दीत १०० कसोटी सामने खेळताना ३९९ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
सौरव गांगुलीच्या झाल्या अनेक चाचण्या; हॉस्पिटलने दिले प्रकृतीबाबत मोठे अपडेट्स
आर अश्विन, रिषभ पंतसह पाच भारतीय खेळाडू ‘आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी शर्यतीत
कचरा वेचणारा मुलगा ते ‘युनिव्हर्स बॉस’