नागपूर। येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि सिक्की रेड्डी या जोडीने अंतिम फेरीत प्राजक्ता सावंत आणि संयोगिता घोरपडे या जोडीला पराभूत करून स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.
हा सामना अश्विनी आणि रेड्डीने २१-१४, २१-१४ असा सरळ सेटमध्ये सहज जिंकला. पहिल्या सेटमध्ये दोन्हीही जोड्यांनी सुरवातीला बरोबरीचा खेळ केला होता. परंतु हळूहळू अश्विनी आणि रेड्डीने आपली आघाडी वाढवली आणि सेट आपल्या नावावर केला.
दुसऱ्या सेटमध्ये सुरवातीला प्राजक्ता आणि संयोगिताने ८-५ अशी आघाडी घेतली होती मात्र अश्विनी आणि रेड्डीने अनुभवाच्या जोरावर ही आघाडी तोडत हा सेट २१-१४ असा जिंकून सामनाही जिंकला.
अश्विनीचे हे या स्पर्धेतील दुसरे विजेतेपद ठरले. तिने या सामन्याआधी मिश्र दुहेरी खेळताना सात्विक साईराजच्या साथीने अंतिम फेरीत तिची महिला दुहेरीचे साथीदार रेड्डी आणि प्रणव जेरी चोप्रा यांच्या विरुद्ध विजय मिळवला आहे.