भारताची राष्ट्रीय नेमबाज कोनिका लायक (konika layak) हीने आत्महत्या केली आहे. कोनिकाच्या आत्महत्येच्या बातमीनंतर भारतातील संपूर्ण नेमबाजी विश्व हादरले आहे. मागच्या चार महिन्यांतील ही चौथी वेळ आहे, जेव्हा एखाद्या नेमबाजाने आमहत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोनिका माजी ऑलिम्पियन आणि अर्जून पुरस्कार विजेते जॉयदीप कर्माकर यांच्याकडून कोलकातामध्ये नेमबाजीचे प्रशिक्षण घेत होती. गुरुवारी (१६ डिसेंबर) तिने तिच्या हॉस्टेलच्या खोलीत गळफास लावून जीव दिला.
कोनिका लायकची आत्महत्येची बातमी या कारणास्तव जास्त चिंतेचा विषय ठरत आहे, कारण गेल्या चार महिन्यांमध्ये ही एका नेमबाजाद्वारे केले गेलेली चौथी आत्महत्या आहे. कोनिकाच्या आत्महत्येपूर्वी मागच्या आठवड्यात पिस्टल शुटर खुशसीरत कौर संधू याने शुटिंग नॅशनलमध्ये कमी गुण मिळाल्यामुळे निराशेमध्ये आत्महत्या करण्याचे पाऊल उचलले होते. तसेच राज्यस्तरिय नेमबाज हुनरदीप सिंग सोहल आणि मोहालीच्या नमनवीर सिंग बराड या दोघांनी देखील आत्महत्या करण्याचे पाऊल उचलले होते.
एका वृत्तमाध्यमाने कोनिकाचे प्रशिक्षक जॉयदीप यांच्याशी या घटनेसंदर्भात चर्चा केली. माध्यमाशी बोलताना जॉयदीप म्हणाले की, “मागच्या १० दिवसात कोनिकाने खूप सारे सराव सत्र रद्द केले होते आणि कोणत्यातरी कारणामुळे चिंतेत असल्यासारखी वाटत होती.”
जॉयदीप यांनी पुढे बोलताना खुलासा केला की, “कोनिका मागच्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय चॅम्पियनशिपसाठी क्वालीफाय करू शकली नव्हती. कारण तिने या स्पर्धेत अपात्र ठरवण्यात आले होते. जीवी मालवंकर चॅम्पियनशिपमध्ये तिच्या प्रदर्शनानंतर देखील कोनिका निराश होती.”
प्रशिक्षक जॉयदीप पुढे म्हणाले की, या बातमीमुळे ते खूपच हादरले आहेत. त्यांना अशीही माहिती मिळाली होती की, कोनिका पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात लग्न करणार आहे. अशात तिच्या आत्महत्येमागे नेमके कारण अस्पष्ट आहे. तपासानंतर तिच्या अत्महत्येचे खरे कारण स्पष्ट होऊ शकेल.
कोनिकाला नेमबाजीच्या अनेक स्पर्धांमध्ये जुन्या रायफलचा उपयोग करताना पाहिले गेले होते. तिला एका नवीन रायफलची गरज असल्याचे लक्षात आल्यानंतर बॉलिवुड अभिनेता सोनु सुदने तिला एक नवीन जर्मन रायफल भेट केली होती.
महत्वाच्या बातम्या –
दक्षिण आफ्रिका क्रिकेटला गालबोट, डिविलियर्स, स्मिथसारख्या दिग्गज खेळाडूंवर गंभीर आरोप
रोहित ते अक्षर, २०२१ वर्षांत भारतीय संघाकडून रचण्यात आले ‘हे’ ५ विक्रम
दुसऱ्या ऍशेस कसोटीत वॉर्नर, स्टोक्स, अँडरसन रचू शकतात इतिहास, ‘या’ मोठ्या विक्रमांची होणार नोंद