पुणे। महाराष्ट्र संघाने मिनी फुटबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या वतीने आणि मिनी फुटबॉल असोसिएशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने होत असलेल्या राष्ट्रीय सब-ज्युनियर मिनी फुटबॉल स्पधेर्तील १२ वर्षांखालील मुलांच्या गटातून अंतिम फेरीत प्रवेश केला.
मुकुंदनगर येथील महाराष्ट्र मंडळाच्या चंद्रशेखर आगाशे कॉलेजच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील १२ वर्षांखालील मुलांच्या उपांत्य फेरीत महाराष्ट्राने हरियाणावर ३-०ने मात केली. यात महाराष्ट्राकडून शुभम शेट्टी (३ मि.), कुशल कोरे (७ मि.) आणि मोहिझ (२१ मि.) यांनी गोल केले. महाराष्ट्राची आता विजेतेपदासाठी तमिळनाडूविरुद्ध लढत होईल. दुस-या उपांत्य लढतीत तमिळनाडूने विदर्भ संघावर २-०ने मात केली. तमिळनाडूकडून हैदतुल्लाने (५, ७ मि.) दोन्ही गोल केले.
यानंतर १४ वर्षांखालील मुलांच्या गटातील अंतिम लढत बेंगलोर आणि दीव-दमण यांच्यात रंगणार आहे. पहिल्या उपांत्य लढतीत बेंगलोरने तमिळनाडूवर १-०ने मात केली. यात दहाव्या मिनिटाला एस. कमटेने केलेला गोल निर्णायक ठरला. दुस-या उपांत्य लढतीत दीव-दमण संघाने मुंबईचे आव्हान ३-१ने परतवून लावले. यात दीव-दमण संघाकडून सिद्धेश पंधारेने (३, ५ मि.) दोन गोल केले, तर रक्षित दुधाणीने (२२ मि.) एक गोल केला. मुंबईकडून एकमेव गोल रोहितने (१२ मि.) केला.