पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात कसोटी मालिकेतील पहिला सामना कराची नुकताच येथे खेळला गेला. या सामन्यात शुक्रवारी(२९ जानेवारी) पाकिस्तानने ५ विकेट्सने विजय मिळवला. या विजयात पाकिस्तानचा फिरकीपटू नौमान अलीने दुसऱ्या डावात ५ विकेट्स घेत मोलाची कामगिरी बजावली आहे. विशेष म्हणजे अलीचा हा पदार्पणाचा कसोटी सामना असल्याने त्याने एक खास विक्रमही केला आहे.
अलीने शुक्रवारी त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच ५ विकेट्स घेण्याची कामगिरी केली. याबरोबरच तो गेल्या ७१ वर्षातील पदार्पणाच्या कसोटी सामन्यात एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा सर्वात वयस्कर पुरुष क्रिकेटपटू ठरला आहे. शुक्रवारी ज्यावेळी अलीने तेंबा बाऊमाला ४० धावांवर बाद केले आणि डावातील त्याची पाचवी विकेट घेतली, तेव्हा त्याचे वय ३४ वर्षे ११४ दिवस इतके होते. याबरोबरच तो गेल्या ८७ वर्षात अशी कामगिरी करणारा पहिला फिरकीपटूही ठरला आहे.
नौमान अलीने दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना तेंबा बाऊमाच्या आधी एन्रीच नॉर्किए, कागिसो रबाडा, जॉर्ज लिंड आणि एडेन मार्करमला बाद केले होते. त्यामुळे त्याच्या नावावर दुसऱ्या डावात २५.३ षटकात ३५ धावांसह ५ विकेट्सची नोंद झाली. त्याने याआधी पहिल्या डावातही २ विकेट्स घेतल्या होत्या.
पाकिस्तानची दमदार कामगिरी
पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पाकिस्तानच्या गोलंदाजांनी पहिल्या डावात २२० धावांवरच रोखले. त्यानंतर फलंदाजी करताना सुरुवातीच्या विकेट्स झटपट गमावल्यानंतर पाकिस्तानकडून फवाद आलमने (१०९) शतकी खेळी करत पहिला डाव सांभाळला. त्याच्या शतकाला अझर अली(५१) आणि फहिम अश्रफच्या (६४) अर्धशतकांची जोड मिळाली. त्यामुळे पाकिस्तानने पहिल्या डावात सर्वबाद ३७८ धावा करत १५८ धावांची आघाडी घेतली.
यानंतर दक्षिण आफ्रिकेला पाकिस्तानच्या गोलंदाजांसमोर अधिक काळ टिकाव धरता आला नाही. दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव नौमान अली आणि यासिर शहा यांच्या गोलंदाजीसरमोर २४५ धावांत अटोपला. तरी मार्करम(७४) आणि रस्सी वॅन डर दसन(६४) या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी झुंज दिली. मात्र पाकिस्तानने घेतलेल्या १५८ धावांच्या आघाडीमुळे दक्षिण आफ्रिकेला पाकिस्तानसमोर ८८ धावांचेच आव्हान ठेवता आले.
हे आव्हान पाकिस्तानने ३ विकेट्स गमावत सहज पार केले आणि सामना जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
…म्हणून जॉनी बेयरस्टोला विश्रांती देण्याचा निर्णय योग्य, इंग्लंडच्या प्रशिक्षकाने सांगितले कारण
‘त्या’ दोघांमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर करू शकलो खुलून फलंदाजी, चेतेश्वर पुजाराने उलगडले रहस्य