भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार कसोटी सामन्यांची बॉर्डर गावसकर मालिका नुकतीच पार पडली. ही मालिका भारतीय संघाने 2-1 अशा फरकाने जिंकत सलग दुसर्यांदा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका विजय मिळवला आहे. त्यानंतर आता भारतीय संघ मायदेशी परतला आहे. ब्रिस्बेन येथे झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाच्या महत्त्वाच्या गोलंदाजाला दुखापत झाली होती. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीला ग्रोइन स्ट्रेनची दुखापत झाली होती. त्यामुळे या सामन्यात तो आपले सर्वश्रेष्ठ योगदान देवू शकला नाही. मात्र तरीही त्याने कर्णधाराचे न ऐकता 5 षटके गोलंदाजी केली होती.
भारतीय संघाचा 23 वर्षीय युवा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीने अथक मेहनतीनंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिकेत भारतीय संघाकडून कसोटी पदार्पण केले होते. ही मिळालेली संधी नवदीपला गमवायची नव्हती. यावर नवदीप सैनी म्हणाला की त्याने दुसर्या डावात गोलंदाजी करून दुखापत अजून वाढवून घेण्याची जोखीम घेतली. मात्र जे काही त्याने दावावर लागले होते, ते बघता त्याच्यासमोर कोणताच पर्याय उपलब्ध नव्हता.
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी पीटीआय सोबत बोलताना म्हणाला, “अजिंक्य भाईने मला विचारले की मी या दुखापतीत गोलंदाजी करू शकशील का? मला फक्त हो म्हणावे लागले.”
नवदीप सैनी गाबा येथे फक्त 7.5 षटके गोलंदाजी करू शकला. ही पहिल्या डावातील गोष्ट आहे. मात्र त्याने आपल्या संघातील इतर खेळाडूंना आत्मविश्वास वाढविण्यासाठी मदत केली.
नवदीप सैनी पुढे म्हणाला,” मी सामन्यापुर्वी ठीक होतो परंतू अचानक दुखापत झाली. मी विचार करत होतो की, हे सगळं एवढ्या महत्वाच्या सामन्यात का होत आहे. खूप कालावधीनंतर भारतीय संघाकडून मला खेळण्याची संधी मिळाली होती. दुखापत झाल्यावर कर्णधाराने मला विचारले होते की मी खेळू शकेल का? मला वेदना होत होत्या. परंतु मी सांगितले, जे करता येईल, ते करण्यासाठी मी तयार आहे. ”
भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्याची कसोटी मालिका खेळी जाणार आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यासाठी भारतीय संघाची निवड झाली आहे. मात्र या संघात नवदीप सैनीची निवड करण्यात आली नाही. या मालिकेला 5 फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे. यावर नवदीप सैनी म्हणाला की तो आपल्या दुखापतीतून सावरत आहे. त्यातून तो लवकरच फिट होईल.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाचे प्रमुख गोलंदाज मोहम्मद शम्मी आणि उमेश यादव यांना दुखापत झाली होती. त्यामुळे नवदीप सैनीवर लगेच चांगली कामगिरी करण्याचा दबाव आला होता. मात्र त्याने या मालिकेपूर्वी कसोटी सामने खेळले नव्हते. परंतू त्यापुर्वी त्याने भारतीय संघाकडून मर्यादित षटकांचे सामने खेळले होते. तसेच तो आयपीएलचाही भाग होतो. बेंगलोरकडून खेळताना त्याने चांगली कामगिरी केली होती.