पुणे : उत्तेजक सेवन करणे हा क्रीडा क्षेत्रासाठी काळिमा आहे. त्यामुळेच उत्तेजकाचे मुळापासून उच्चाटन करण्यासाठी खेळाडू व यांच्या प्रशिक्षकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे, असे राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्था (नाडा) चे सरसंचालक नवीन अगरवाल यांनी सांगितले.
केंद्र सरकार व महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे पुण्यातील महाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत आयोजित खेलो इंडियात सहभागी झालेल्या खेळाडू व प्रशिक्षकांसाठी अगरवाल यांचे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यास ४०० हून अधिक खेळाडू उपस्थित होते. या महोत्सवात नाडातर्फे खेळाडूंची कसून उत्तेजक तपासणी केली जाणार आहे.
नवीन अगरवाल म्हणाले, जागतिक स्तरावर यश मिळविण्यासाठी अनेक खेळाडू उत्तेजकचा झटपट मार्ग स्वीकारतात. मात्र, त्यामध्ये ते दोषी आढळल्यानंतर खेळाडूंवर कठोर कारवाई होते. कधी कधी त्यांच्यावर तहहयात बंदीची कारवाई झाल्यास त्यांचे क्रीडा क्षेत्रातील करिअरच संपुष्टात येते. हे लक्षात घेऊनच खेळाडूंनी उत्तेजकाच्या आहारी जाऊ नये. आपल्या देशातही अनेक क्रीडा प्रकारांच्या सबज्युनिअर गटाच्या स्पर्धांपासून अनेक स्पर्धांमध्ये खेळाडू दोषी ठरण्याच्या घटना दिसून येतात. याबाबत खेळाडूंप्रमाणेच त्यांच्या पालकांनीही योग्य ती काळजी घेतली पाहिजे.
ते पुढे म्हणाले, शाळा व महाविद्यालये हे खेळाडू घडण्याचे व्यासपीठ असते. त्यांच्या करिअरच्या सुरुवातीलाच त्यांना कोणती औषधे व आहारांबाबत उत्तेजकांचा समावेश असतो, याची माहिती देण्याची आवश्यकता आहे. विविध क्रीडा संस्थांच्या वैद्यकीय तज्ज्ञांनी वेळोवेळी उत्तेजकाची माहिती अद्ययावत करून घेण्याची गरज आहे. तसे झाल्यास उत्तेजकांच्या घटना कमी होतील व क्रीडा क्षेत्र स्वच्छ होण्यास मदत होईल, असेही अगरवाल यांनी सांगितले. खेळाडूंबरोबरच उपस्थित असलेल्या प्रशिक्षकांच्या शंकांचेही अगरवाल यांनी निरसन केले.