ठाणे दि. २९ :- महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व ठाणे जिल्हा कबड्डी असो.च्या मान्यतेने आमदार गणपतशेठ गायकवाड व नवतरुण क्रीडा मंडळाने स्व. अनिल महादेव कर्पे यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित केलेल्या “देवेंद्र फडणवीस चषक पुरुष-महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत” बाबुराव चांदेरे सोशल फौंडेशन-पुणे, शिवशंकर क्रीडा मंडळ-ठाणे, छावा स्पोर्ट्स क्लब-कोल्हापूर, बंड्या मारुती सेवा मंडळ-मुंबई शहर यांनी पुरुषांत, तर महेशदादा लांडगे स्पोर्ट्स क्लब, राजमाता जिजाऊ या पुण्याच्या दोन संघा बरोबर महात्मा गांधी स्पोर्ट्स क्लब-मुंबई उपनगर व शिवशक्ती महिला संघ- मुंबई शहर यांनी महिलांत उपांत्य फेरीत धडक दिली.
कोळशेवाडी-कल्याण(पूर्व) येथील स्व.दादासाहेब गायकवाड क्रीडांगणावर सुरू असलेल्या पुरुषांच्या उपांत्यपूर्व सामन्यात पुण्याच्या बाबुराव चांदेरे सोशल फौंडेशनने उपनगरच्या स्वस्तिक क्रीडा मंडळाला ५०-२८ असे सहज नमवित आपली आगेकूच सुरू ठेवली. मध्यांतरापर्यंत चुरशीने खेळल्या गेलेल्या या सामन्यात १८-१३ अशी आघाडी बाबुराव चांदेरे या संघाकडे होती. मध्यांतारानंतर मात्र पुण्याच्या संघाने आपल्या खेळाचा गिअर बदलला. त्यांच्या अक्षय जाधव, सुनील दुबिले यांनी जोरदार आक्रमण करीत चढाईत गुण वसूल केले. त्याला विकास काळे यांनी भक्कम पकडी करीत छान साथ दिली. त्यामुळेच पुणेकरांनी हा सामना २२ गुणांच्या फरकाने जिंकता आला. स्वस्तिकच्या विवेक काजळे, सिद्धेश पांचाळ, निलेश शिंदे यांचा खेळ उत्तरार्धात फिका पडला.
मुंबई शहराच्या बंड्या मारुती सेवा मंडळाने ५-५ चढायांच्या चुरशीच्या डावात ठाण्याच्या ओम कबड्डी संघाचा प्रतिकार २४-२१(७-४) असा मोडून काढत उपांत्य फेरीत धडक दिली. शेवटच्या क्षणापर्यंत अटीतटीच्या खेळल्या गेलेल्या या सामन्यात विश्रांतीला ९-८ अशी आघाडी बंड्या मारुतीकडे होती. पूर्ण डावात १७-१७ अशी बरोबरी झाली. ५-५ चढायांच्या डाव देखील चुरशीने खेळला गेला. डावाची शेवटची (५वी) चढाई बंड्या मारुतीची होती. बंड्या मारुतीकडे १ गुणांची आघाडी होती. शेवटची चढाई शुभम चौघुलेने केली. त्याची पकड झाली असती तर पुन्हा सुवर्ण चढाईचा डाव खेळावा लागला असता. पण त्याने दोन गडी टिपत संघाला ३ गुणांनी विजय मिळवून दिला. शुभम शिंदे, मंगेश घाडगे, निलेश लाड बंड्या मारुतीकडून, तर विवेक काजळे, सिद्धेश पांचाळ, निलेश शिंदे स्वस्तिककडून उत्कृष्ट खेळले.
कोल्हापूरच्या छावा स्पोर्ट्स क्लबने स्व. आकाश क्रीडा मंडळाचे आव्हान ३५-१७ असे संपविले. विश्रांतीपर्यंत चुरशीने खेळल्या या सामन्यात विश्रांतीला १३-११ अशी २ गुणांची आघाडी छावा संघाकडे होती. विश्रांतीनंतर छावाने टॉप गिअर टाकत जोरदार खेळ करीत सामना एकतर्फी केला. ऋषी व ज्ञानेश्वर या गावडे बंधूंच्या जोशपूर्ण चढाया त्याला ऋतुराज कोरवी यांनी दिलेली पकडीचा भक्कम साथ यामुळे छावाने हा विजय साकारला. स्व. आकाशकडून जितेश, महेश, वैभव या पाटील बंधूंचा खेळ विश्रांतीनंतर बहरला नाही.
ठाण्याच्या शिवशंकर क्रीडा मंडळाने उपनगरच्या सत्यम सेवा मंडळाला ३६-२३ असे नमवित उपांत्य फेरी गाठली. निलेश साळुंखे, गणेश जाधव, सुरज बनसोडे, मंगेश सोनावणे यांच्या चढाई-पकडीच्या खेळाच्या जोरावर पहिल्या डावात २०-१३ अशी आघाडी घेणाऱ्या शिवशंकरला दुसऱ्या डावात कडव्या लढतीला सामोरी जावे लागले. सत्यमच्या नितीन देशमुख, सुमित चाळके, विजय चव्हाण यांनी दुसऱ्या डावात आपला खेळ गतिमान करीत सामन्यात चांगली रंगत आणली. त्या अगोदर झालेल्या उपउपांत्यपूर्व पुरुषांच्या सामन्यात १)छावा स्पोर्ट्स वि वि जय हनुमान ३७-२४; २)सत्यम सेवा वि वि केदारनाथ ३७-२२; ३)बाबुराव चांदेरे वि वि जय शिव ४१-१५; ४)बंड्या मारुती विरुद्ध संघ न आल्यामुळे त्यांना पुढे चाल देण्यात आली.
महिलांच्या उपांत्यपूर्व सामन्यात पुण्याच्या महेशदादा लांडगे स्पोर्ट्सने चुरशीच्या लढतीत ठाण्याच्या शिवतेज मंडळाला २५-२० असे पराभूत करीत उपांत्य फेरी गाठली. मध्यांतराला दोन्ही संघ १०-१० असे बरोबरीत होते. अनुष्का फुगे, दीपाली कांबळे, वैष्णवी काडगे, ऋतुजा शिंदे महेशदादाकडून, तर निकिता कदम, माधुरी गवंडी, निधी मोरे शिवतेजकडून छान खेळल्या. पुण्याच्याच राजमाता जिजाऊ संघाने उपनगरच्या स्वराज्य स्पोर्टसवर ३९-२४ अशी मात केली. मध्यांतराला २७-१२ अशी आश्वासक आघाडी घेणाऱ्या राजमाताने उत्तरार्धात संयमी खेळ करीत हा सामना आपल्या बाजूने झुकविला. सलोनी गजमल, पल्लवी जमदाडे, ऋतुजा निगडे, मानसी सावंत यांच्या चढाई-पकडीच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते. स्मिता पांचाळ, समृद्धी मोहिते, काजल खैरे स्वराज्यकडून चांगला प्रतिउत्तर दिले.
उपनगरच्या महात्मा गांधी स्पोर्ट्सने एकतर्फी सामन्यात ठाण्याच्या राफा नाईक संघाचा ४९-०८ असा धुव्वा उडविला. सायली जाधव, दर्शना सणस यांच्या धारदार चढाया रोखायला, तर सायली साळुंखे, तेजस्वी पाटेकर यांच्या भक्कम बचाव भेदावयास राफ नाईककडे उत्तर नव्हते. राफची उर्मिला नांदवडेकर बरी खेळली.
शेवटच्या सामन्यात मुंबई शहराच्या शिवशक्ती महिला संघाने शहरच्याच डॉ.शिरोडकर स्पोर्ट्सवर ४३-१९असा लिलया विजय मिळवीत उपांत्य फेरी गाठली. पहिल्या डावात सावध खेळ करीत १९-११ अशी आघाडी घेणाऱ्या शिवशक्तीने दुसऱ्या डावात आपला खेळ अधिक आक्रमक करीत हा विजय साकारला. ऋणाली भुवड, पूजा यादव यांच्या चतुरस्त्र चढाया त्याला पौर्णिमा जेधे, आरती पाटील यांची मिळालेली पकडीची भक्कम साथ यामुळे हे शक्य झाले. डॉ. शिरोडकरच्या धनश्री पोटले, तेजश्री चौगुले यांचा खेळ संघाचा पराभव टाळण्यास कमी पडला. या अगोदर झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात स्वराज्य स्पोर्टसने अमरहिंदला २७-२०; तर डॉ. शिरोडकरने महात्मा फुलेला ३८-३७ असे पराभूत करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.