नाशिक । द केन्सिंग्टन क्लब येथे १६ आणि १७ जून दरम्यान रंगलेल्या एनडीबीए केन्सिंग्टन बॅडमिंटन लीगचे विजेतेपद नाशिक सुपर किंग्ज संघाने पटकावले. विजेत्यांना नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, द केन्सिंग्टन क्लबचे विक्रांत मते यांच्या हस्ते ट्रॉफी आणि बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी नाशिक जिल्हा बॅडमिंटन असो.चे अध्यक्ष राधेशाम मुंदडा, सचिव अनंत जोशी, सर्व संघांचे मालक, योगेश एकबोटे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
नाशिकमधील बॅडमिंटनची प्रगती वाखणण्याजोगी आहे. स्पोर्ट्स काट्याच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना आर्थिक मदत. आजवर 7 खेळाडूंना 20 लाखाची मदत मिळाली आहे. शिष्यवृत्तीसाठी संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी केले. क्लबमधील बॅडमिंटन हॉलचे या स्पर्धेच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने उदघाटन झाले असून दरवर्षी या स्पर्धा द केन्सिंग्टन क्लब येथे विनामूल्य भरवण्यात येतील असे विक्रांत मते यांनी जाहीर केले.
शनिवार आणि रविवारी पाच सत्रांत झालेल्या साखळी सामन्यांत अव्वल दोन संघांदरम्यान अंतिम सामना चुराशीचा झाला. पहिल्या चार सामन्यांत 2-2 गुण मिळवण्यात प्रतिस्पर्ध्यांना यश मिळाले. पहिल्या सामन्यात आदिश शटलर्सच्या अमित देशपांडे आणि शंतनू पवार या संघाचा राजू लोहार आणि स्वप्नील आफळे यांनी २१-११, २१-११ असा सरळसेट मध्ये पराभव करत संघाला आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सामन्यातही सुपरकिंग्जने २१-११, २१-११ असा विजय मिळवून दिला. तिसरा सामना १५ वर्षाखालील मिश्र गटाच्या संघामध्ये झाला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात आदिश शटलर्सच्या अर्णव कडलग आणि श्रावणी वाळेकर यांनी सुपरकिंग्जच्या कृष्णा मजेठा आणि नंदिनी भार्गव यांचा २१-१९, १७-२१, २१-१७ असा पराभव करत संघाचे गुणांचे खाते उघडले. या सामन्यात चारही ज्युनिअर खेळाडूंची खेळामधील परिपक्वता बघावयास मिळाली. दोन्ही बाजूने जबरदस्त स्मॅशेज प्रेक्षकांकडून वाहवा मिळवली. चौथ्या सामन्यात आदिश शटलर्सने विजय मिळवत बरोबरी साधली. पाचव्या सामना सुपरकिंग्जने आपल्या नावे केला आणि सहाव्या सामन्यात २१-१०, २१-१५ असा विजय मिळवताना ट्रम्प गुणाची कमाई करत विजयी आघाडी मिळवली.
तत्पूर्वी एनडीबीए केन्सिंग्टन बॅडमिंटन लीगच्या साखळी सामन्यांतली चुरस दुसऱ्या दिवशीही कायम राहिली. साखळी सामन्यांच्या अखेरीस आदिश शटलर्स 23 गुण, डायनॅमिक शटलर्स 19 गुण, एमएसजे वॉरिअर्स 18, निवेक 18, सुलर जायंट्स 17 आणि नाशिक सुपर किंग्जने 20 गुण मिळवले. तक्त्यात आघाडीवर असलेल्या आदिश शटलर्स (23) आणि नाशिक सुपर किंग्ज (20) या संघांना अंतिम सामन्यासाठी संधी मिळाली. संपूर्ण स्पर्धेत ट्रम्प गुणाने रंगत आणली.
साखळी सामन्यांच्या अखेरच्या टप्प्यात आदिश शटलर्सने एकूण २३ गुण मिळवताना निवेकवर 6-1 अशी मोठ्या फरकाने मात केली. 7 पैकी तब्बल 5 सामने 2 ट्रम्प गुणांसह जिंकले. तर दुसऱ्या क्रमांकासाठी नाशिक सुपर किंग्ज आणि डायनॅमिक शटलर्स मध्ये प्रचंड स्पर्धा झाली. एसएसकेने 5 सामन्यांत 20 गुण मिळवत अंतिम फेरी गाठली. डायनॅमिक १९ गुण मिळवले. त्यांची अंतिम त्यांची अंतिम फेरीची संधी थोडक्यात हुकली.
या स्पर्धेत वयवर्षे 12 ते 55 वर्षापर्यंतच्या 96 खेळाडूंनी सहभाग नोंदवला. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी यांनी पराग एकांडे, समीर रहाळकर, अश्विन सोनवणे, पराग पवार परिश्रम घेतले. अजिंक्य पाटील यांनी प्रमुख पंच, विक्रांत बिडगर, विशाल शिरसाठ, अनिकेत पाटील, प्रसाद शिवदे, मिहीर मैशिरी, ओंकार गायधनी यांनी पंच म्हणून काम पाहिले. योगेश एकबोटे यांनी सूत्रसंचालन तर यांनी अनंत जोशी यांनी आभार मानले.