साल १९९६ आणि तारीख १३ मार्च. भारताच्या क्रिकेट इतिहासातील काळा दिवस म्हणून ज्या दिवसाची नोंद झाली तो हा दिवस. भारतीय क्रिकेट चाहत्यांनी आंतरराष्ट्रीय पटलावर याच दिवशी भारतीय क्रिकेटचे नाव बदनाम केले. आजही त्या दिवसाचा उल्लेख झाला तर, प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीचे एक ओंगळवाणे रूप आठवते.
नाणेफेक जिंकून अझरचा अनपेक्षित निर्णय
भारतीय उपखंडात १९९६ चा विश्वचषक खेळला जात होता. साखळी सामने संपल्यानंतर ऑस्ट्रेलिया, भारत, श्रीलंका आणि वेस्ट इंडीज या संघांनी उपांत्य फेरीत जागा पक्की केली. पहिली उपांत्य फेरी यजमान भारत आणि संपूर्ण स्पर्धत धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या श्रीलंका यांच्यात कोलकत्ता येथील ईडन गार्डनवर खेळवण्यात येणार होती.
ईडन गार्डनच्या त्या देखण्या मैदानावर १३ मार्च रोजी श्रीलंकेचा कर्णधार अर्जुन रणतुंगा व भारतीय कर्णधार मोहम्मद अझहरुद्दिन नाणेफेकीसाठी उतरले. अजहरुद्दीनने नाणेफेक जिंकत सर्वांच्या अपेक्षेविरुद्ध क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. श्रीलंकेने या मालिकेत धावांचा पाठलाग करताना अत्यंत जोरदार कामगिरी केली असल्याने, त्यांची लय बिघडवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्याने सांगितले.
श्रीलंकेची सन्मानजनक धावसंख्या
श्रीलंकेची फलंदाजी सुरू झाली आणि संपूर्ण स्पर्धेत तुफान फॉर्ममध्ये असणाऱ्या रोमेश कालुवितरणा व सनथ जयसूर्या यांना जवागल श्रीनाथने फलकावर अवघी १ धाव असताना माघारी धाडले. पुन्हा, असाका गुरुसिम्हा संघाच्या ३५ धावा झाल्या असताना बाद झाला. अरविंद डिसिल्वा-रोशन महानामा यांच्या अर्धशतकांच्या आणि कर्णधार अर्जुन रणतुंगा, हसन तिलकरत्ने व चामिंडा वास यांच्या उपयुक्त योगदानाच्या जोरावर श्रीलंकेने कशाबश्या २५१ धावा उभारल्या.
सचिन बाद झाला आणि…
प्रत्युत्तरात, भारताला नवज्योत सिंग सिद्धूच्या रूपाने ८ धावांवर पहिला धक्का बसला. मात्र, त्यानंतर सचिन तेंडुलकर व संजय मांजरेकर ही मुंबईकर जोडी मैदानात जमली. दोघांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांचा सामना करत दुसऱ्या गड्यासाठी ९० धावा जोडल्या. सचिन ६५ धावाकडून खेळत होता.
प्रमुख गोलंदाजांना बळी मिळवता येत नाहीत, हे पाहून अर्जुन रणतुंगाने चेंडू कामचलाऊ मात्र हमखास बळी मिळवून देणाऱ्या सनथ जयसूर्याच्या हाती दिला. आपल्या बॅटने स्पर्धा गाजवत असलेल्या जयसूर्याने कर्णधाराला निराश न करता पहिल्याच षटकात जम बसलेल्या, सचिनला बाद केले. सचिन बाद झाल्यानंतर जे काही घडले ते ऐतिहासिक होते. काळा इतिहास म्हटलं तरी चालेल.
त्यानंतर भारताचे खेळाडू कशाप्रकारे बाद झाले ते जरा पाहूया. ९९/३ ( अझहरुद्दीन ०), १०१/४ (संजय मांजरेकर २५), ११०/५ (जवागल श्रीनाथ ६), ११५/६ (अजय जडेजा ०) ,१२०/७ (नयन मोंगिया १), १२०/८ (आशिष कपूर ०). भारताचा डाव ९८/२ पासून १२०/८ असा पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. भारताच्या फलंदाजांना ना काय झाले? हे कोणालाच समजले नाही.
विनोद कांबळीचा तो रडका चेहरा
भारताचा एकमेव प्रमुख फलंदाज असलेला विनोद कांबळी १० धावांवर नाबाद असताना कोलकात्यातील प्रेक्षक हिंसक झाले. स्टेडियममध्ये आग लावली गेली, बाटल्या, बूट-चप्पल आणि जे काही हातात आले ते मैदानात फेकण्यात येत होते. मॅच रेफ्री क्लाईव्ह लॉईड यांनी तातडीने मैदानावर पोहोचून सामना थांबविला आणि श्रीलंकेला विजयी घोषित केले. श्रीलंकेचे खेळाडू आर्मीच्या गराड्यात आणि विनोद कांबळी रडतरडत मैदानाबाहेर जात होता. ते चित्र भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात ओंगळवाण्या चित्रांपैकी एक होते.
श्रीलंका बनला विश्वविजेता
विश्वचषकाचा संभाव्य विजेता असलेला भारतीय संघ विश्वचषकातून अत्यंत विचित्र पद्धतीने बाहेर पडला. पुढे, अंतिम फेरीत श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला मात देत विश्वचषक आपल्या नावे केला. अर्जुन रणतुंगाची बेमिसाल कप्तानी आणि जयसूर्या-कालुवितरणा यांची फटकेबाजी यासाठी हा विश्वचषक कायम लक्षात राहिला.
ज्यावेळी भारतीय क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंगचे तुफान आले आणि मोहम्मद अझहरुद्दीन त्या तुफानात अडकला. त्यावेळी, या सामन्यावरही प्रश्नचिन्हे लावली गेली. विनोद कांबळीने तर सरळ पुढे येऊन म्हटले की, अझरने तो सामना फिक्स केला होता. पुढे यावर बराच वाद निर्माण झाला. २०१२ मध्ये अझहरुद्दीनला मॅच फिक्सिंगच्या आरोपातून निर्दोष मुक्त केले गेले. परंतु, भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील हा काळा दिवस विसरणे केवळ अशक्य!!!
वाचा –
ऑटोचालकाचा मुलगा ते बीएमडब्ल्यूचा मालक! वाचा मोहम्मद सिराजच्या संघर्षमय क्रिकेट प्रवासाची कहाणी
वेस्ट इंडीजच्या दोन टी२० विश्वचषक विजयाचा साक्षीदार, ज्याला मिळाली नाही अपेक्षेप्रमाणे संधी