---Advertisement---

श्रीलंकेने नेदरलँड्सचा ४४ धावांत धूव्वा उडवत मिळवला दणदणीत विजय, ‘हा’ विक्रमही केला नावावर

On: शनिवार, ऑक्टोबर 23, 2021 12:33 AM
Sri-Lanka
---Advertisement---

श्रीलंकेने टी२० विश्वचषक २०२१ च्या पहिल्या फेरीतील अंतिम साखळी सामन्यात शुक्रवारी (२२ ऑक्टोबर) नेदरलँडचा ८ गडी राखून दणदणीत पराभव केला आहे. दासून शनाकाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेच्या संघाने साखळी टप्प्यातील तिन्ही सामने जिंकले. संघाने त्याच्या गट-अ मध्ये ६ गुणांसह अव्वल स्थान मिळवले. यासह, त्याने सुपर -१२ टप्प्यासाठी पात्रता देखील मिळवली. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत सामन्यात सामन्यात शेवटपर्यंत वर्चस्व गाजवले. या सामन्यात श्रीलंकेने नेदरलँडला नमवून टी२० विश्वचषकात एका विक्रमाची नोंद केली आहे.

टी२० विश्वचषक स्पर्धेत एखाद्या संघाला सर्वात कमी धावसंख्येवर रोखण्याचा विक्रम श्रीलंकेने तिसऱ्यांदा केला आहे. नेदरलँडला ४४ धावांवर गुंडाळून श्रीलंकेने या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे. पहिल्या आणि तिसऱ्या स्थानावर देखील श्रीलंकेचाच संघ आहे. २०१४ सालच्या विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेने नेदरलँडला ३९ धावात गुंडाळून या यादीत पहिले स्थान पटकावले होते. याच विश्वचषक स्पर्धेत त्यांनी न्यूझीलंड संघाला ६० धावावर सर्वबाद केले होते.

तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर अनुक्रमे वेस्टइंडिज आणि नेपाळ संघ आहेत. वेस्टइंडिजने २०१० सालच्या विश्वचषकात ६८ धावांवर आयर्लंडला रोखले होते. तर २०१४ सालच्या टी२० विश्वचषकात नेपाळने हॉंगकॉंगला ६९ धावांवर गारद केले होते.

शुक्रवारी शारजामध्ये खेळल्या गेलेल्या या गट-अ सामन्यात नेदरलँड्स संघाला फक्त १० षटके खेळता आली. त्यांचा डाव अवघ्या ४४ धावांवर गडगडला. यानंतर श्रीलंकेने ७.१ षटकांत २ गडी गमावून लक्ष्य गाठले. श्रीलंकेकडून लाहिरु कुमारा आणि वनिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले, तर कुशल परेरा ३३ धावांवर नाबाद परतला. त्याने २४ चेंडूचा सामना करत ६ चौकार लगावले.

अवघ्या ४५ धावांच्या सहज लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने २ गडी गमावले. डावाच्या दुसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर, पथुम निसांका (०) ब्रेंडन ग्लोव्हरने मीकरनच्या हाती झेलबाद केले. यानंतर, यष्टीरक्षक-फलंदाज कुसल परेराने आणि चरित असलंका (६) सह, डाव पुढे गेला आणि दुसऱ्या विकेटसाठी २४ धावा जोडल्या. असलंकाला मीकेरनने फ्रेड क्लासेनच्या हाती झेलबाद केले.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा श्रीलंकेचा निर्णय योग्य होता. फक्त नेदरलँडचा फलंदाज कॉलिन एकरमन (११) दुहेरी अंक गाठू शकला. त्याने ९ चेंडू खेळले आणि १ चौकार, १ षटकार मारला. श्रीलंकेकडून लाहिरु कुमाराने ७ धावांत ३ बळी घेतले तर वानिंदू हसरंगाने ९ धावांत ३ बळी घेतले. महेश ठिक्षणाने एकमेव एक षटक टाकत फक्त ३ धावा दिल्या आणि २ बळी घेतले. दुशमंता चमीरानेही १ विकेट घेतली.

टी२० विश्वचषक स्पर्धेच्या ‘गट अ’ मधून श्रीलंका संघासोबत, नामिबियाने देखील सुपर -१२ मध्ये स्थान मिळवले आहे, त्यांनी ३ पैकी २ सामने जिंकले आणि ४ गुण मिळवले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

आता रंगणार सुपर १२ फेरीचा थरार! कधी, कुठे होणार सर्व सामने, जाणून घ्या एका क्लिकवर

‘हे’ दोन संघ टी२० विश्वविजेता बनण्याचे सर्वात मोठे दावेदार, शेन वॉर्नने वर्तवले भाकीत

नामिबियाचा आयर्लंडला पराभवाचा धक्का; ८ विकेट्सने विजय मिळवत सुपर १२ मध्ये दणक्यात प्रवेश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---