आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धा सुरू झाली आहे. पात्रता फेरीनंतर आता सर्वांच्या नजरा सुपर १२ च्या सामन्यांकडे लागल्या आहेत. क्रिकेट जगतातील बड्या दिग्गजांनी या स्पर्धेत कोण विजयी होईल यावर अंदाज बांधायला सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाचा महान लेगस्पिनर शेन वॉर्ननेही या स्पर्धेत कोण विजयी होईल यावर भाकीत केले आहे.
वॉर्नच्या मते १४ वर्षांनंतर भारतीय संघाचे पुन्हा एकदा टी -२० जेता बनण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. यासोबतच वॉर्नने इंग्लंड संघावरही आपला विश्वास व्यक्त केला आहे.
शेन वॉर्नने ट्वीट केले, ‘मला वाटते की भारत आणि इंग्लंड हे टी२० चे विश्वविजेता बनण्याचे सर्वात मोठे दावेदार आहेत. आयसीसी स्पर्धांमध्येही न्यूझीलंडचा संघ चांगली कामगिरी करतो. यावेळी क्रिकेट चाहते ऑस्ट्रेलियाला फारशी किंमत देत नाही आहे. पण माझा विश्वास आहे की या संघात अनेक सामना जिंकवून देणारे खेळाडू आहेत. यानंतर पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजकडूनही बऱ्यापैकी अपेक्षा आहेत. बघूया कोण बनतो चॅम्पियन. मी या स्पर्धेबद्दल खूप उत्साहित आहे.’
शेन वॉर्नने ऑस्ट्रेलियाच्या डेविड वॉर्नर आणि ओएन मॉर्गन यांचाही उल्लेख केला आहे. जे या स्पर्धेची सुपर १२ फेरी सुरू होण्यापूर्वी खराब फॉर्ममध्ये होते.
शेन वॉर्नने लिहिले की, ‘जे लोक खराब फॉर्ममुळे डेविड वॉर्नर आणि मॉर्गन यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत, त्यांना मी एव्हढेच सांगू इच्छितो की, फॉर्म हा तात्पुरता असतो, पण दर्जा हा कायम राहतो. या दोघांपैकी कोणीही प्लेअर ऑफ द टूर्नामेंट झाल्यास, चाहत्यांना आश्चर्य वाटण्याची गरज नाही.’
स्पर्धेच्या सराव सामन्यात भारताची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. भारतीय संघाने दोन्ही सामने जिंकले. भारताने आपल्या दुसऱ्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ अतिशय वाईट टप्प्यातून जात आहे. ऑस्ट्रेलियाला सलग ५ टी२० मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यावर्षी ऑगस्टमध्ये बांगलादेशने ५ सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा ४-१ ने पराभव केला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
नामिबियाचा आयर्लंडला पराभवाचा धक्का; ८ विकेट्सने विजय मिळवत सुपर १२ मध्ये दणक्यात प्रवेश
उत्सुकता भारत-पाकिस्तान सामन्याची! तिकीटं ३३३ पट महाग, तर हॉटेलही झाले फुल





