भारतात इंडियन प्रीमियर लीग 2026 हंगामाचा थरार शेवटाला आला आहे. आज (रविवार, 31 मे) अहमदाबादमध्ये अंतिम सामना रंगणार आहे. चाहत्यांना त्याची उत्सुकता असून नेपाळने मात्र आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये कहर केला आहे. नेपाळचा संघ नवनवे विक्रमे रचत चालला आहे. तेथे क्रिकेटची प्रचंड क्रेझ असून त्याचे परिणामही स्पष्टपणे दिसत आहेत, कारण त्यांनी पुन्हा एकदा टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात 300 धावांचा टप्पा ओलांडला आहे. हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक नवीन विश्वविक्रम म्हणता येईल. टी 20 क्रिकेटमध्ये इतर कोणत्याही संघाने एका डावात एकापेक्षा अधिक वेळा 300 धावा केलेल्या नाहीत आणि नेपाळ संघाने ही कामगिरी मात्र दुसऱ्यांदा केली आहे.
आंतरराष्ट्रीय टी 20 मध्ये आतापर्यंत पाच संघांनी 300 पेक्षा अधिक धावसंख्या केल्या आहेत. यामध्ये नेपाळने दोनदा ही कामगिरी केली आहे. तसेच झिम्बाब्वे, जर्मनी आणि इंग्लंड यांनी प्रत्येकी एकदा.
सिंगापूरमध्ये रविवारी (31 मे) आशियाई क्रीडा (एशियन गेम्स) स्पर्धेच्या पुरुष टी20 आंतरराष्ट्रीय पात्रता फेरीला जबरदस्त सुरूवात झाली. पहिला सामना नेपाळ विरुद्ध चीन असा खेळला गेला, ज्यामध्ये नेपाळने चौकार-षटकारांचा पाऊस पाडत 20 षटकांत 2 विकेट्स गमावत 313 धावसंख्या उभारली. त्यांचा सलामीवीर कुशल भुर्तेलने 43 चेंडूंत 5 चौकार आणि 16 षटकारांसह 129 धावा केल्या. नेपाळची ही धावसंख्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमधील तिसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. पहिल्या स्थानी झिम्बाब्वे असून त्यांनी 2024 मध्ये गाम्बिया विरुद्ध 344 धावा केल्या होत्या. दुसऱ्या स्थानी नेपाळच असून त्यांनी 2023 मध्ये मंगोलिया विरुद्ध 314 धावा केल्या होत्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना चीनचा संघ 19.2 षटकांत 92 धावा करत गारद झाला आणि नेपाळने हा सामना 221 धावांनी जिंकला. धावांच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधील हा सातवा सर्वात मोठा विजय ठरला आहे.






