---Advertisement---

बाबो…नेपाळचा कहर! 20 षटकात 300पेक्षा जास्त धावा चोपत घडवला इतिहास, रोहितचा वेगवान शतकाचा रेकॉर्डही तुटला

Kushal-Malla
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नेपाळ क्रिकेट संघ आपले वर्चस्व निर्माण करताना दिसत आहे. सध्या चीनच्या हांगझोऊ शहरात आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 सुरू आहेत. यातील पुरुष आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील पहिला सामना नेपाळ विरुद्ध मंगोलिया संघात पार पडला. या सामन्यात नेपाळने टी20 क्रिकेटच्या इतिहासातील जबरदस्त कारनामा केला आहे. त्यांनी 20 षटकात 300हून अधिक धावा केल्या आहेत. तसेच, संघाच्या खेळाडूनेही आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतकक करण्याचा विक्रमही आपल्या नावे केला आहे. त्याने भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि दक्षिण आफ्रिकेचा डेविड मिलर या दोघांचा विक्रम मोडीत काढला आहे.

टी20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या
बुधवारी (दि. 27 सप्टेंबर) नेपाळ विरुद्ध मंगोलिया (Nepal vs Mangolia) संघात सामना खेळला गेला. या सामन्यात मंगोलिया संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी नेपाळ (Nepal) संघाने निर्धारित 20 षटकात 314 धावांचा भलामोठा डोंगर उभारला. विशेष म्हणजे, ही टी20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या आहे. आजपर्यंत कुठल्याच संघाला टी20 इतिहासात 20 षटकात एवढ्या धावा करता आल्या नव्हत्या.

कुशल मल्लाचे 34 चेंडूत शतक
याव्यतिरिक्त नेपाळ संघाचा विस्फोटक फलंदाज कुशल मल्ला याने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा भीमपराक्रम केला. त्याने अवघ्या 50 चेंडूत 8 चौकार आणि 12 षटकारांच्या मदतीने नाबाद 137 धावांची झंझावाती शतकी खेळी साकारली. त्याने यावेळी अवघ्या 34 चेंडूत शतक ठोकले, जे टी20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक आहे.

यापूर्वी हा विक्रम भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज डेविड मिलर (David Miller) यांच्या नावावर होता. या दोघांनी 35 चेंडूत शतक ठोकले होते. याव्यतिरिक्त झेक रिपब्लिकच्या सुदेश विक्रमसेकारा यानेही 35 चेंडूत शतक केले होते. मात्र, आता मल्ला या सर्वांना पछाडत विक्रमवीर बनला आहे.

कुशल मल्ला या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला होता. सलामीवीर प्रत्येकी वैयक्तिक 20 धावांच्या आत तंबूत परतल्यानंतर मल्लाने पुढची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि झंझावाती फलंदाजी केली. त्याच्याव्यतिरिक्त कर्णधार रोहित पौडेल याने 61 आणि दिपेंद्र सिंग यानेही नाबाद 52 धावांची खेळी साकारली. यांच्या फलंदाजीमुळे नेपाळने हा इतिहास घडवला. आजपर्यंत कुठल्याच संघाला टी20 क्रिकेटमध्ये 300 धावांचा आकडा पार करता आला नव्हता, पण नेपाळने हा विक्रम करून दाखवला. (Big News nepal team scored 314 runs in t20i kushal malla breaks rohit sharma fastest century record)

हेही वाचा-
विश्वचषक संघातून तमिम इकबालचा पत्ता कट, शाकिब करणार बांगलादेशचे नेतृत्व, ‘असा’ आहे संघ
न्यूझीलंड संघाचा स्पेशल विजय, 15 वर्षांमध्ये बांगलादेशमध्ये केली ‘ही’ मोठी कामगिरी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---