भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली ७ फेब्रुवारीपासून ICC T20 वर्ल्ड कप २०२६ चा थरार रंगणार आहे. या मोठ्या स्पर्धेच्या सुरुवातीपूर्वीच नेपाळ क्रिकेट संघाने मोठा धमाका केला आहे. गुरुवारी खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात (Warm-up Match) नेपाळने शानदार कामगिरी करत कॅनडाचा ६ गडी राखून पराभव केला आणि इतर संघांना एक मोठा इशारा दिला आहे.
या सामन्यात नेपाळच्या खेळाडूंनी प्रत्येक विभागात उत्कृष्ट कामगिरी केली आणि १६१ धावांचे लक्ष्य सहज पूर्ण करत विजय मिळवला. या धडाकेबाज विजयाने नेपाळने हे स्पष्ट केले आहे की, ते टी-२० वर्ल्ड कपमध्ये केवळ सहभाग घेण्यासाठी नाही, तर कडवी झुंज देण्यासाठी आले आहेत.
चेन्नईच्या एम. चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सराव सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना कॅनडाच्या संघाने २० ओव्हरमध्ये ६ बाद १६१ धावा केल्या होत्या. मात्र, कॅनडाची सुरुवात खास झाली नाही आणि केवळ १८ धावांवर सलामीवीर युवराज समरा (७ धावा) बाद झाला. त्यानंतर नवनीत धालीवालने ४१ धावा, श्रेयस मोव्वा याने नाबाद ३८ धावा आणि अखेरीस जस्करन सिंहने २१ धावांची वेगवान खेळी करत कॅनडाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली.
नेपाळकडून संदीप लामिछाने याने ४ ओव्हरमध्ये केवळ १४ धावा देऊन २ बळी घेतले. तसेच कुशल भुर्तेलने २ विकेट्स घेतल्या, तर सोमपाल कामी आणि नंदन यादव यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.
१६२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेपाळच्या संघाने दमदार सुरुवात केली आणि पॉवरप्लेमध्येच सामन्यावर मजबूत पकड मिळवली. नेपाळच्या फलंदाजांनी कॅनडाच्या गोलंदाजांची धुलाई करत पहिल्या ६ ओव्हरमध्येच ७५ धावा कुटल्या. नेपाळसाठी आसिफ शेख याने सर्वाधिक ५८ धावा (२९ चेंडू) केल्या, ज्यात ६ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. तसेच सुंदीप जोरा याने ४४ धावांची महत्त्वाची खेळी केली, तर गुलसन झा (नाबाद ३१) आणि दिपेंद्र सिंह ऐरी (९ धावा) यांनी नेपाळच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
नेपाळने हे लक्ष्य १८ ओव्हरमध्येच ४ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. नेपाळचा हा विजय केवळ एक विजय नसून टी-२० वर्ल्ड कपपूर्वी प्रतिस्पर्धी संघांना दिलेला एक भक्कम संदेश आहे.
टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी नेपाळला ग्रुप ‘सी’ मध्ये इंग्लंड, इटली, स्कॉटलंड आणि वेस्ट इंडिजसोबत ठेवण्यात आले आहे. नेपाळचा संघ ८ फेब्रुवारीला मुंबईत इंग्लंडविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. त्यानंतर १२ फेब्रुवारीला इटली आणि १५ फेब्रुवारीला वेस्ट इंडिजचा सामना करेल. नेपाळचा शेवटचा ग्रुप स्टेज सामना १७ फेब्रुवारीला स्कॉटलंडविरुद्ध होईल. विशेष म्हणजे, बांगलादेशच्या ऐवजी स्कॉटलंडला या स्पर्धेत स्थान देण्यात आले आहे.





