---Advertisement---

जेव्हा नेपाळच्या गोलंदाजाने एका वनडे सामन्यात १० विकेट्स घेत रचला होता इतिहास

On: मंगळवार, जून 23, 2020 1:28 PM
---Advertisement---

कसोटीमध्ये एका सामन्यात एखाद्या गोलंदाजने ५ विकेट्स, १० विकेट्स घेतलेल्या सहज पहायला मिळतात. अगदी जीमी लेकर आणि अनिल कुंबळेने कसोटीच्या एका डावात १० विकेट्स घेण्याचाही पराक्रम केला आहे. पण मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये ५ विकेट्स घेणे देखील अवघड असते तिथे एका गोलंदाजाने १० विकेट्स घेणे हा मोठा कारनामाच आहे. पण असा कारनामा केला तो नेपाळच्या मेहबूब आलमने.

२५ मे २००८ ला ग्रेनविले, सेंट सेव्हियर, जर्सी येथे पार पडलेल्या आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग डिव्हिजन ५ स्पर्धेतील नेपाळ विरुद्ध मोझाम्बिक सामन्यात आलमने हा कारनामा केला होता. वासिम आक्रमला आदर्श मानणाऱ्या आलमचा त्यावेळी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही समावेश झाला.

आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग डिव्हिजन ५ स्पर्धेत नेपाळचा समावेश अ गटात होता. या गटात त्यांच्यासह मोझाम्बिक, जर्मनी, यूएसए, नॉर्वे आणि वानुआतू या संघांचा समावेश होता. या स्पर्धेत मोझाम्बिक आणि नेपाळमधील सामना पावसामुळे वाया गेला होता. त्यावेळी मोझाम्बिकने ७० धावा केल्या होत्या. परंतु पावसामुळे सामना रद्द झाला. पण त्यांच्यातील सामना २५ मे ला पुन्हा खेळवण्यात आला.

त्यावेळी मोझाम्बिकचा कर्णधार शोएब युनुसने नाणेफेक जिंकत नेपाळला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. त्यावेळी सुरुवातीला असिफ कोलिया आणि इम्तियाझ लीलीने मोझाम्बिककडून शानदार गोलंदाजी करत नेपाळची आवस्था ३० धावा ३ बाद अशी केली होती.

परंतू नंतर ज्ञानेंद्र मल्ला आणि शक्ती गौचनने(३४) ७३ धावांची भागीदारी करत नेपाळचा डाव सावरला. त्यानंतर मल्ला(७१) आणि पारस खाडका(४४) यांच्यात ८० धावांची भागीदारी झाली. त्यामुळे नेपाळने ५० षटकात ७ बाद २३८ धावा केल्या.

त्यानंतर २३९ धावांचे आव्हान घेऊन मोझाम्बिकचा संघ फलंदाजीला उतरला. पहिले षटक इम्रान इस्माईलने खेळून काढले. मात्र त्यानंतर आलमचे आक्रमण सुरु झाले. आलमने इम्रानला आणि नादिक करिमला त्रिफळाचीत केले. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर खेळणाऱ्या महमूद सिदातला आलमने पायचित केले.

त्यामुळे मोझाम्बिकचे पहिले तीनही फलंदाज शून्य धावा करुन बाद झाल्याने मोठा धक्का संघाला बसला. सिदातला बाद केल्यानंतर पुढच्याच चेंडूवर झानिउल पटेल देखील पायचीत झाला. त्यामुळे आलमला हॅट्रिकची संधी होती. पण यष्टीरक्षक फलंदाज जयेश खोरावाने त्याचा चेंडू खेळून काढला. खोरावाला ५ चेंडूचा सामना करता आला परंतु तो देखील आलमच्या गोलंदाजीवर शुन्य धावांवर असताना पायचीत झाला.

त्याच्यापाठोपाठ कमरान कादिर ६ चेंडू खेळून आलमच्या गोलंजीवर पायचीत झाला. यावेळी कलीम शाह मोझाम्बिककडून झुंज देत होता. मात्र दुसऱ्या बाजूने आलमच्या गोलंदाजीसमोर फलंदाज टिकाव धरत नव्हते. अखेर ४१ चेंडूत ९ धावा केल्यावर कलीम शहाची झुंज आलमनेच संपवली. कलीम शहाचा झेल यष्टीरक्षक महेश छेत्रीने घेतला. त्यापाठोपाठ आलमने चंद्र पुसपुसेन, असिफ कोलिया आणि इम्तियाझ लीली या तिघांनाही त्रिफळाचीत करत १९ धावांवर मोझाम्बिकचा डाव संपवला आणि वनडेत १० विकेट्स घेण्याचा कारनामा केला.

या सामन्यात ७.५ षटके गोलंदाजी आलमने केली होती. त्यातील १ षटक त्याने निर्धाव टाकले. तर एकूण १२ धावा देत १० विकेट्स घेतल्या होत्या. नेपाळ संघाने गोलंदाजी दरम्यान एकूण ८ अतिरिक्त धावा दिल्या होत्या. यात आलमने टाकलेल्या ४ वाईड चेंडूंचाही समावेश होता. आलमने या कामगिरीने क्रिकेट इतिहासात त्याचे नाव कामयचे कोरले आहे.

वाचनीय लेख – 

२०११ विश्वचषकात घरी बसवलेला क्रिकेटर ते टीम इंडियाचा हिटमॅन, पहा रोहितचा १३ वर्षांचा प्रवास

रोहित शर्माने असे वाजवले तेराचे बारा, म्हणून झाला हिटमॅन

पाकिस्तान दौरा केलेला एकमेव क्रिकेटपटू आजही खेळतोय टीम इंडियाकडून

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---