गुवाहाटी । येथील इंदिरा गांधी अॅथलेटीक स्टेडियमवर बुधवारी नॉर्थइस्ट युनायटेड एफसी आणि एफसी पुणे सिटी यांच्यात लढत होत आहे. निर्णायक विजय मिळाल्यास नॉर्थइस्ट बाद फेरीतील स्थान नक्की करेल. त्याच निर्धाराने ते खेळतील.
यंदाच्या मोसमात तीनच सामने गमावलेल्या चार संघांमध्ये एल्को शात्तोरी यांच्या नॉर्थइस्टचा समावेश आहे. 16 सामन्यांतून त्यांच्या खात्यात 27 गुण जमले आहेत. गुणतक्त्यात त्यांचा तिसरा क्रमांक आहे. मुंबई सिटी एफसीवर मागील सामन्यात 2-0 अशी मात केल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे. पुणे सिटीच्या आव्हानाचा ते निर्धाराने सामना करण्यास सज्ज झाले आहेत.
शात्तोरी यांनी सांगितले की, मी खेळाडूंना बाद फेरी पात्रतेविषयी काहीही बोललेलो नाही. मला खरोखरच एका वेळी एक सामना असाच दृष्टिकोन ठेवायचा आहे. याचे कारण गेल्या 10 सामन्यांचा आढावा घेतला तर संघात फेरबदल करण्याची वेळ जवळपास दहा वेळा आली.
आतापर्यंत 12 गोल केलेला बार्थोलोम्यू ओगबेचे नॉर्थइस्टसाठी महत्त्वाचा खेळाडू राहील. फेरॅन कोरोमीनास याला गाठण्यासाठी त्याला दोन गोलांची गरज आहे. त्याला फेडेरिको गॅलेगो याचा बहुमोल पाठिंबा मिळतो आहेत. सर्वाधिक अॅसिस्टच्या क्रमवारीत गॅलेगो संयुक्त दुसरा आहे. नव्याने करारबद्ध केलेला पॅनागीओटीस ट्रीयाडीस हा सुद्धा आक्रमणात मोक्याच्या क्षणी प्रभाव पाडतो आहे.
शात्तोरी यांनी सांगितले की, मुंबई सिटीविरुद्ध आमचे डावपेच आक्रमणाच्यादृष्टिने अचूक ठरले. जसे अपेक्षित होते तसेच घडले, पण प्रत्येक गोष्ट सुरळीतच घडेल अशी पूर्ण खात्री असल्याचे गृहीत धरून मी येथे बसलो आहे असे नाही.
पुणे सिटीसाठी मोसमाचा प्रारंभ खराब झाला, नवे प्रशिक्षक फिल ब्राऊन यांच्या मार्गदर्शनाखाली मात्र पुणे सिटीला फॉर्म मिळाला आहे. त्यांचा याआधीचा पराभव नोव्हेंबरमध्ये बेंगळुरू एफसीविरुद्ध झाला. त्यानंतर पुणे सिटीने पाच सामन्यांत चार विजय मिळविले असून 18 गुणांसह त्यांचा सातवा क्रमांक आहे.
ब्राऊन यांनी संघात जान निर्माण केली असून आता बाद फेरीची किंचीतशी संधी सुद्धा त्यांना आहे, पण त्यासाठी नॉर्थइस्ट आणि मुंबईने उरलेल्या सामन्यांत गुण गमावणे आवश्यक असेल.
ब्राऊन यांनी सांगितले की, मी ज्या खेळाडूंच्या गटाबरोबर काम करतो आहे त्यांनी मला प्रभावित केले आहे. माझ्या पद्धतींचा त्यांनी फार चांगला अवलंब केला आहे. प्रशिक्षक या नात्याने तुम्ही यामुळे आनंदित होता. आमच्या संघात चांगले गोल करणारे खेळाडू आहेत. त्यामुळे प्रशिक्षक या नात्याने तुम्ही तुमच्या पद्धतींचा बऱ्याच विश्वासाने अवलंब करू शकता. खास करून भारतीय खेळाडूंनी या शैलीचा चांगला अवलंब केला आहे.
मागील सामन्यात पुणे सिटीने जमशेदपूरला पुणे सिटीने हरविले. यात स्ट्रायकर रॉबिन सिंग याचा दोन गोलांचा वाटा होता. अलिकडील सामन्यांत प्रतिस्पर्ध्यांसाठी तो धोकादायक ठरतो आहे. याशिवाय आशिक कुरुनियन प्रतिस्पर्धी फुल-बॅक्सना जेरीस आणतो आहे. जमशेदपूरविरुद्ध मार्सेलिनीयोला चौथे यलो कार्ड मिळाले असल्याने तो निलंबीत असेल. यानंतरही ब्राऊन अवे सामन्यांत सलग चौथ्या विजयासाठी प्रयत्नशील असतील.
नॉर्थइस्टकरीता बाद फेरी प्रथमच गाठण्याची संधी आवाक्यात आहे. अशावेळी घरच्या मैदानावर स्थानिक प्रेक्षकांच्या साक्षीने यावर शिक्कामोर्तब करण्याची संधी दवडली जाऊ नये म्हणून ते निर्धाराने खेळतील.