आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजे आयसीसीने आज खेळाडूंची नवी कसोटी क्रमवारी जाहीर केली. या नव्या क्रमवारीत भारताच्या खेळाडूंना चांगलाच फायदा झाला आहे. भारताचे तब्बल सहा खेळाडू वेगवेगळ्या क्रमवार्यांमध्ये पहिल्या दहामध्ये सामील आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव स्मिथने फलंदाजांच्या क्रमवारीतील आपले अव्वल स्थान अबाधित राखले आहे.
रहाणे पुन्हा पहिल्या दहामध्ये सामील
न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यात संपन्न झालेल्या कसोटी मालिकेनंतर आयसीसीने ही नवी क्रमवारी जाहीर केली. फलंदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव स्मिथ हा ९११ गुणांसह पहिल्या स्थानावर कायम आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात न खेळण्याचे नुकसान न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याला सोसावे लागले. मागील क्रमवारीत भारतीय कर्णधार विराट कोहलीसोबत संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानी असलेला विल्यमसन आता तिसऱ्या स्थानी घसरला आहे. त्यामुळे विराट कोहली आता स्मिथनंतर दुसऱ्या स्थानावर मजबुतीने उभा ठाकलेला दिसून येतो.
विराट कोहलीशिवाय भारताचा प्रमुख फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे हे अव्वल १० मध्ये आहेत. पुजारा आपल्या सातव्या स्थानी कायम आहे तर, न्यूझीलंडच्या टॉम लॅथमला मागे टाकत रहाणे पुन्हा एकदा पहिल्या १० जणांमध्ये दाखल झाला. ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज मार्नस लॅब्युशेन व पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम अव्वल पाचमध्ये आहेत.
गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराह आणि अश्विन दहात
आयसीसी कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार पॅट कमिन्स हा देखील ९०४ गुणांसह पहिल्या स्थानावर कायम आहे. मात्र, या क्रमवारीमध्ये भारताच्या दोन गोलंदाजांना प्रत्येकी एका स्थानाचा फायदा झाला. अव्वल वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह व अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन हे अनुक्रमे आठव्या आणि दहाव्या क्रमांकावर आले आहेत. या यादीमध्ये ऑस्ट्रेलियाचे सर्वाधिक ३ तर भारत, न्यूझीलंड आणि इंग्लंडचे प्रत्येकी दोन गोलंदाज आहेत. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा पाचव्या स्थानी आहे.
अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत स्टोक्स पहिल्या क्रमांकावर
अष्टपैलू खेळाडूंच्या कसोटी क्रमवारीत पहिल्या सहा स्थानांमध्ये कसलाही बदल झाला नाही. इंग्लंडचा बेन स्टोक्स, वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर आणि भारताचा रवींद्र जडेजा हे पहिल्या तीन स्थानावर आहेत. तसेच, गोलंदाजांच्या क्रमवारीत दहाव्या स्थानावर असलेला रविचंद्रन अश्विन अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत सहाव्या स्थानी कायम आहे. इंग्लंडचा अनुभवी स्टुअर्ट ब्रॉड बऱ्याच कालावधीनंतर पहिल्या दहामध्ये सामील झालाय.
संबधित बातम्या:
– अब आयेगा मजा! रोहित झाला ऑस्ट्रेलियाला रवाना; खेळणार इतके कसोटी सामने
– हा संघ जिंकेल २-१ ने मालिका; शेन वॉर्नचे कसोटी मालिकेपूर्वी भाकीत
– जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये न्यूझीलंडची झेप; भारताची वाट झाली अवघड