---Advertisement---

भारतीय क्रिकेटपटूंना लवकरच मिळणार मोठे गिफ्ट, बीसीसीआय सचिव जय शहा यांची घोषणा

On: शनिवार, ऑगस्ट 3, 2024 10:07 PM
Jay-Shah
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून नुकतीच सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने 3-0 च्या फरकाने टी20 मालिका जिंकली आहे. त्यानंतर 2 ऑगस्टपासून वनडे मालिकेला सुरुवात झाली आहे. ही मालिका 7 ऑगस्टला संपेल. यादरम्यान बीसीसीआय सचिव जय शाह यांनी शनिवारी (3 ऑगस्ट) रोजी मोठी घोषणा केली आहे. जय शाह यांच्या या घोषणेमुळे भारतीय खेळाडूंना तगडा फायदा होणार आहे.

भारतीय क्रिकेट बोर्ड लवकरच भारतीय क्रिकेटपटूंना एक मोठी भेट देणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आपल्या एक्स (पूर्वीच्या ट्विटर) वरील पोस्टद्वारे या भेटीचा खुलासा केला.

जय शाह यांनी शनिवारी सांगितले की, लवकरच नवीन राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) चे उद्घाटन केले जाईल. या नव्या अकादमीत 45 सराव खेळपट्ट्या आणि ऑलिम्पिक आकाराचा स्विमिंग पूल आणि इतर सुविधा असतील.

बीसीसीआयची सध्याची राष्ट्रीय क्रिकेट अकादमी ही बंगळुरुतील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आहे. त्यामुळे एकाच वेळेस सामना आणि सराव अशा दोन्ही गोष्टी शक्य होत नाहीत. त्यामुळे या स्टेडियमपासूनच हाकेच्या अंतरावर नव्या अकादमीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यानंतर आता या अकामदीचे काम पूर्णपणे संपायला आले आहे.

याबाबत माहिती देताना शाह म्हणाले की, बेंगळुरूमधील नवीन एनसीएमध्ये ‘अत्याधुनिक प्रशिक्षण, क्रीडा विज्ञान सुविधा’ देखील असतील. शाह यांनी इंस्टाग्रामवर लिहिले की, “बीसीसीआयच्या नवीन राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (एनसीए) काम जवळजवळ पूर्ण झाले आहे आणि लवकरच बंगळुरूमध्ये खेळाडूंसाठी एनसीए सुरू होईल, हे जाहीर करताना मला खूप आनंद होत आहे.”

“नवीन एनसीएमध्ये तीन जागतिक दर्जाचे खेळाचे मैदान, 45 सराव खेळपट्ट्या, इनडोअर क्रिकेट खेळपट्ट्या, एक ऑलिम्पिक आकाराचा स्विमिंग पूल आणि अत्याधुनिक प्रशिक्षण, पुनर्प्राप्ती आणि क्रीडा विज्ञान सुविधा असतील. या उपक्रमामुळे देशातील वर्तमान आणि भविष्यातील क्रिकेटपटूंना सर्वोत्तम वातावरणात त्यांचे कौशल्य विकसित करण्यास मदत होईल”, असेही शाह म्हणाले.

हेही वाचा – 

दीपिका कुमारीचं स्वप्न पुन्हा भंगलं, तिरंदाजीतील भारताचं आव्हान संपुष्टात
लक्ष्य सेनची ‘लक्षवेधी’ कामगिरी, ऑलिम्पिकच्या 128 वर्षांच्या इतिहासात असं करणारा पहिलाच भारतीय!
मोठी बातमी! ऑलिम्पिक दरम्यान भारतीय खेळाडूचा पॅरिसमध्ये कार अपघात, कुटुंबीयही होते सोबत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---