आयसीसीनं टी20 विश्वचषकासाठी न्यूयॉर्कमध्ये तात्पुरतं क्रिकेट स्टेडियम उभारलं होतं. या स्टेडियमवरील सर्व सामने संपले आहेत. त्यामुळे आता हे स्टेडियम नष्ट करण्यात येणार आहे.
आयसीसीनं नासाऊ, आयझेनहॉवर पार्क, न्यूयॉर्क येथे टी20 विश्वचषक 2024 साठी तात्पुरतं स्टेडियम उभारलं होतं. येथे विश्वचषकातील एकूण 8 सामने खेळले गेले. विशेष म्हणजे, यापैकी एकही सामना हाय स्कोयरिंग नव्हता. सहसा चाहत्यांना टी20 क्रिकेटमध्ये असे सामने पाहायला आवडत नाहीत. यावरून आयसीसीवर टीकाही झाली आहे.
या स्टेडियममध्ये 4 ड्रॉप-इन खेळपट्ट्या वापरण्यात आल्या, ज्या काही महिन्यांपूर्वीच ऑस्ट्रेलियाच्या ॲडलेडहून आणल्या गेल्या होत्या. ड्रॉप-इन खेळपट्ट्या सेट होण्यासाठी 8 ते 10 महिने लागतात. परंतु न्यूयॉर्कच्या स्टेडियमवर खेळपट्ट्या आणल्यानंतर अवघ्या 8 ते 10 आठवड्यांतच टी20 विश्वचषकाचे सामने खेळवण्यात आले. याचा परिणाम असा झाला की, या मैदानातील पहिल्या डावातील धावांची सरासरी केवळ 108 धावांची होती.
हे स्टेडियम तयार करण्यासाठी आयसीसीनं सुमारे 250 कोटी रुपये खर्च केले. हे स्टेडियम 106 दिवसांत पूर्ण झालं होतं. मात्र हे तात्पुरतं स्टेडियम असल्यानं ते आता पाडण्यात येणार आहे. बुधवारी (12 जून) झालेल्या भारत विरुद्ध अमेरिका सामन्यानंतर स्टेडियम पाडण्याचं काम सुरू झालं, जे सुमारे 6 आठवड्यांत पूर्ण होईल. सामना संपल्यानंतरच स्टेडियम उद्ध्वस्त करण्यासाठी बुलडोझर आलं होतं. पुढील महिन्याअखेरीस या स्टेडियमचा मागमूसही उरणार नाही. मात्र येथे ड्रॉप-इन खेळपट्ट्या राहतील का? ते अद्याप ठरलेलं नाही.
आयसीसीच्या अधिकाऱ्यांनी ‘क्रिकबझ’ला सांगितलं की, जर नासाऊ काउंटीच्या अधिकाऱ्यांना या खेळपट्ट्या त्याच ठिकाणी ठेवायच्या असतील आणि त्यांची देखभाल होत असेल, तर त्या तेथे राहू शकतात. अन्यथा या खेळपट्ट्या पुन्हा दुसरीकडे नेल्या जातील.
‘क्रिकबझ’च्या वृत्तानुसार, ‘मेजर लिग क्रिकेट’मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाचा बेस न्यूयॉर्कमध्ये आहे. यामुळे येथे अंबानी नजीकच्या भविष्यात नवीन स्टेडियम बांधण्याची अपेक्षा आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आयसीसीचा ‘स्टॉप क्लॉक’ नियम काय आहे? ज्यामुळे भारताला 5 धावा फुकट मिळाल्या, जाणून घ्या
सेमी फायनलपूर्वीच भारत-ऑस्ट्रेलिया येणार आमनेसामने! कसं ते समजून घ्या
यशस्वी जयस्वालला प्लेइंग 11 मध्ये न आणता विराट कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर कसं पाठवायचं? मोहम्मद कैफनं सुचवला पर्याय