न्यूझीलंड संघ सध्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड दौर्यावर आहे. उभय संघांमध्ये २ जूनपासून लॉर्डसच्या मैदानावर पहिला कसोटी सामना खेळवला जातो आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी करत संघाला ३७८ धावांचा डोंगर उभारून दिला होता. त्याला गोलंदाजांनी साथ देत इंग्लंडला दुसर्या डावात २७५ धावांवर सर्वबाद केले. त्यामुळे या कसोटीतील एक संपूर्ण दिवस पावसाने वाया गेला असला तरी पाहुण्या संघाला कसोटी विजयाची संधी निर्माण झाली आहे.
अनुभवी टीम साउदीचे बळीचे पंचक
पाहुण्या न्यूझीलंड संघाच्या ३७८ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडची सुरुवात अडखळत झाली होती. अवघ्या १८ धावांवर त्यांनी दोन बळी गमावले होते. मात्र त्यानंतर कर्णधार जो रूट आणि सलामीवीर रॉरी बर्न्सने ९३ धावांची भागीदारी करत दुसर्या दिवसाच्या अखेरपर्यंत इंग्लंडला सुस्थितीत आणण्याचा प्रयत्न केला होता. सामन्याच्या तिसर्या दिवशी पावसामुळे खेळ होऊ शकला नाही. मात्र चौथ्या दिवशी हवामान बदलले आणि त्यासही न्यूझीलंडची गोलंदाजी देखील बदलली.
चौथ्या दिवशीच्या खेळात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी धारदार गोलंदाजीची प्रदर्शन केले. अनुभवी टीम साउदीने इंग्लंडची मधली फळी कापून काढत २ बाद १११ वरुन यजमानांची ६ बाद १४० अशी अवस्था केली. मात्र एक बाजू लावून धरलेल्या सलामीवीर रॉरी बर्न्सने तळाच्या फलंदाजांना साथीला घेत इंग्लंडचा डाव २७५ धावांपर्यंत पोहोचवला. त्याने २९७ चेंडूत १३२ धावांची झुंजार खेळी करतांना एकाकी लढत दिली. इंग्लंडतर्फे त्याच्या व्यतिरिक्त एकाही फलंदाजाला अर्धशतकाची वेसही ओलांडता आली नाही. न्यूझीलंडकडून टीम साउदी ४३ धावांत ६ बळी घेत सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्याला कायले जेमिसनने ३ बळी घेत सुयोग्य साथ दिली.
या कसोटीचा अजून एक दिवस बाकी असून न्यूझीलंडकडे पहिल्या डावात १०३ धावांची आघाडी आहे. ही आघाडी वाढवून शेवटच्या दिवशी इंग्लंडला आव्हानात्मक धावसंख्येचे लक्ष्य देण्याचा न्यूझीलंड प्रयत्न करेल.
महत्त्वाच्या बातम्या-
मला आणखी दोन विश्वचषक खेळायचे आहेत, दिग्गज भारतीय यष्टीरक्षकाचा आशावाद
“सर्फराझची नेतृत्वशैली कोहलीप्रमाणे, धोनीपेक्षा अतिशय भिन्न”, चेन्नईच्या शिलेदाराने केले विश्लेषण
ओळखलंच नाही राव! कोहली ते वॉर्नरसारखे दिसणारे व्यक्ती तुम्हालाही टाकतील गोंधळात; दिसतात जुळे भाऊ