सध्या पाकिस्तानचा संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात पाकिस्तान आणि न्यूझीलंडचे संघ तीन टी-२० आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहेत. या दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडने आपल्या १३ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघात त्यांचा नियमित कर्णधार केन विलिअम्सनचे पुनरागमन झाले असून फिरकी गोलंदाज मिचेल सँटेनरने आपले स्थान कायम राखले आहे.
न्यूझीलंडसाठी महत्वाची मालिका
या कसोटी मालिकेला २६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिला सामना माउंट मांगुनाई येथील बे ओव्हल मैदानावर खेळविण्यात येईल. तर दुसरा सामना ख्राईस्टचर्च येथील हेगले ओव्हल मैदानावर ३ जानेवारी ते ७ जानेवारी दरम्यान खेळविण्यात येईल. ही मालिका न्यूझीलंड संघासाठी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने महत्वाची असेल. वर्षाच्या सुरुवातीला भारतीय संघावर मिळवलेला विजय आणि नुकतेच वेस्ट संघाला २-० फरकाने हरविले असल्याने सध्या न्यूझीलंड या स्पर्धेच्या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे. येत्या मालिकेत जर त्यांनी चांगल्या फरकाने विजय मिळविला आणि भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील कसोटी मालिकेत पराभव पत्करावा लागला तर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील त्यांची जागा जवळपास निश्चित असेल.
Williamson returns & Santner retained for Pakistan series as World Test Championship Final looms 🏏 pic.twitter.com/kGsOyQqmrs
— BLACKCAPS (@BLACKCAPS) December 21, 2020
केन विलिअम्सनचे पुनरागमन
न्यूझीलंडच्या कसोटी संघाचा नियमित कर्णधार केन विलिअम्सन अपत्यजन्मामुळे वेस्ट इंडिज संघाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकला होता. त्याचे पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेसाठी संघात पुनरागमन झाले आहे. त्यामुळे डेव काॅनव्हाय संघाबाहेर झाला आहे. काॅलिन डी ग्रँडहोम अद्याप दुखापतीतून सावरला नसल्याने डॅरेल मिचेलने अष्टपैलू म्हणून आपले स्थान कायम राखले आहे.
न्यूझीलंडचा संपूर्ण संघ:
केन विलिअम्सन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, कायले जेमिसन, टॉम लॅथम, डॅरेल मिचेल, मिचेल सँटेनर, हेन्री निकोल्स, टीम साउदी, रॉस टेलर, नील वॅगनर, बीजे वॅटलिंग, विल यंग.
महत्वाच्या बातम्या:
– पाकिस्तान क्रिकेट संघासाठी वाईट बातम्यांचे सत्र सुरू; हे दोन खेळाडू पहिल्या कसोटीतून बाहेर
– ब्रेकिंग! दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज जॅक कॅलिस बनला इंग्लंड संघाचा फलंदाजी सल्लागार
– क्रिकेटप्रेमींसाठी वाईट बातमी! आयपीएल २०२१ मध्ये नाही खेळणार १० संघ?