भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाला 113 धावांनी पराभव पत्कारावा लागला आहे. टीम इंडियासमोर विजयासाठी 359 धावांचं लक्ष्य होतं, ज्याचा पाठलाग करताना संघाला केवळ 245 धावाच करता आल्या. विशेष म्हणजे, हा सामना अवघ्या तीन दिवसांत संपला!
पुणे कसोटीतील पराभवासह भारतीय संघानं मालिकाही गमावली आहे. तर न्यूझीलंडचा संघ भारतीय भूमीवर प्रथमच कसोटी मालिका जिंकण्यात यशस्वी ठरला. या मालिकेतील पहिला कसोटी सामना बेंगळुरू येथे खेळला गेला होता. या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा 8 विकेटनं पराभव झाला होता. किवी संघानं पहिला कसोटी सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. आता त्यांनी पुणे कसोटीही जिंकून इतिहास रचला आहे. या पराभवासह भारतानं तबब्ल 4331 दिवसांनंतर घरच्या मैदानावर मालिका गमावली आहे.
न्यूझीलंडच्या विजयाचा नायक डावखुरा फिरकीपटू मिचेल सँटनर ठरला. त्यानं सामन्यात एकूण 13 विकेट घेतल्या. सँटनरनं पहिल्या डावात 7 आणि दुसऱ्या डावात 6 विकेट्स घेतल्या. दोन्ही संघांमधील मालिकेतील शेवटचा सामना 1 नोव्हेंबरपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
दुसऱ्या डावात 359 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात दमदार झाली होती. परंतु कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा मिशेल सँटनरच्या गोलंदाजीत केवळ 8 धावा करून बाद झाला. त्यावेळी भारतीय संघाची धावसंख्या 34 धावा होती. गिल (23) सावधपणे खेळत होता. पण लंचनंतर लगेचच तो सँटनरच्या फिरकीत झेलबाद झाला.
यशस्वी जयस्वालनं 41 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं, जे न्यूझीलंडविरुद्ध भारतीय खेळाडूनं केलेलं सर्वात जलद अर्धशतक होतं. जयस्वाल चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचं दिसत होतं. पण तोही 77 धावांवर सँटनरच्या फिरकीत अडकला. यानंतर पंत (0) 127 धावांवर धावबाद झाला. कोहलीकडून (17) मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण तोही सँटनरच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू आऊट झाला.
कोहली बाद झाल्यावर भारतीय संघाची धावसंख्या 147/5 होती. यानंतर सँटनरची जादू पुन्हा एकदा दिसली. त्यानं सरफराज खानला (9) क्लीन बोल्ड केलं. भारताची सातवी विकेट वॉशिंग्टन सुंदरच्या (21) रूपानं आली. तो ग्लेन फिलिप्सच्या चेंडूवर विल यंगच्या हाती झेलबाद झाला. सुंदर बाद झाल्यावर भारतीय संघाची धावसंख्या 167/7 झाली.
यानंतर जडेजा आणि अश्विननं भारताचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र 206 धावांवर अश्विन (18) मिचेल सँटनरचा बळी ठरला. दुसऱ्या डावातील भारतीय संघाची ही आठवी आणि सॅन्टनरची सामन्यातील 13वी विकेट होती. त्यानंतर एजाज पटेलनं आकाश दीपला बाद करून भारताला नववा धक्का दिला. त्यानंतर त्यानंच रवींद्र जडेजाला (42) बाद करून भारताचा डाव गुंडाळला.
हेही वाचा –
“मी खेलरत्न पुरस्कारासाठी पात्र आहे का?”, मनू भाकरची सोशल मीडियावर विचित्र पोस्ट
रिषभ पंत विराट कोहलीमुळे रनआऊट झाला? सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये जुंपली!
यशस्वी जयस्वालने मोडला 45 वर्षे जुना रेकॉर्ड, याबाबतीत कोहलीसह दिग्गजांना टाकले मागे






