टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup)च्या स्पर्धेत शुक्रवारी (4 नोव्हेंबर) सुपर 12चा 37वा सामना न्यूझीलंड विरुद्ध आयर्लंड (NZvIRE)यांच्यात खेळला गेला. ऍडलेडच्या ओव्हलवर खेळला गेलेला हा सामना न्यूझीलंडने 35 धावांनी जिंकला. यामुळे त्यांनी उपांत्य फेरीमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. आयर्लंडविरुद्ध न्यूझीलंडने फलंदाजीबरोबर गोलंदाजी विभागातही उत्तम कामगिरी केली आणि या स्पर्धेत शेवटचा साखळी सामना खेळताना तिसरा विजय मिळवला. सामनावीर विलियमसन ठरला.
या सामन्यात आयर्लंडने नाणेफेक जिंकत न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. न्यूझीलंडकडून फिन ऍलन आणि डेवॉन कॉवने यांनी उत्तम सुरूवात करून दिली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी 5.5 षटकात 52 धावांची भागीदारी केली. फिन 18 चेंडूत 32 धावा करत बाद झाला. यावेळी केन विलियमसन (Kane Williamson) याने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. त्याने डॅरिल मिशेल (Daryl Mitchell) सोबत चौथ्या विकेटसाठी 31 चेंडूत 60 धावांची भागीदारी केली. मिशेल 21 चेंडूत 31 धावा करत नाबाद राहिला तर विलियमसनने 35 चेंडूत 61 धावा केल्या. यामुळे न्यूझीलंडने 20 षटकात 6 विकेट्स गमावत 185 धावसंख्या उभारली.
आयर्लंडकडून जोशुआ लिटिल याने प्रभावी गोलंदाजी केली. त्याने 4 षटकात 20 धावा देत हॅट्ट्रीक घेतली. टी20 विश्वचषकात आयर्लंडकडून हॅट्ट्रीक घेणारा तो कर्टिस कॅम्फरनतंरच दुसरा खेळाडू ठरला. त्याचबरोबर ही टी20 विश्वचषकाच्या इतिहासातील सहावी आणि ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या हंगामातील दुसरी हॅट्ट्रीक ठरली.
A win in Adelaide! Lockie Ferguson leading the way with the ball taking 3-22 while Mitch Santner, Ish Sodhi and Tim Southee each took 2 wickets. Scorecard | | https://t.co/MTvUzqHxR0 #T20WorldCup pic.twitter.com/mQKLOCe8WL
— BLACKCAPS (@BLACKCAPS) November 4, 2022
लक्ष्याचा पाठलाग करताना फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या आयर्लंडची सुरूवात स्फोटक झाली. पॉल स्टर्लिंग आणि कर्णधार अँड्रयू बालबर्नी (Andrew Balbirnie) यांनी पहिल्या विकेटसाठी 49 चेंडूत 68 धावा जोडल्या. मात्र बालबर्नी 30 धावा करत बाद झाला. त्यानंतर काही फरकाच्या अंतराने आयर्लंडचे फलंदाज बाद होत राहिले. या सामन्यात स्टर्लिंग हाच त्यांच्याकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. त्याने 27 चेंडूत 3 चौकार आणि एक षटकार मारत 37 धावा केल्या.
न्यूझीलंडच्या फलंदाजांनी धावांचा डोंगर रचत आधीच आयर्लंडला अडचणीत आणले, त्यात गोलंदाजांनीही उत्तम कामगिरी केली. लोकी फर्ग्युसन याने 4 षटकात 22 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. त्याला मिचेल सँटनर, इश सोधी आणि टीम साऊदी यांनी योग्य साथ दिली. या तिघांनीही प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
या स्पर्धेत न्यूझीलंडने त्यांचे पाच साखळी सामने पूर्ण केले. त्यातील एक सामना पावसामुळे रद्द झाला तर एका सामन्यात इंग्लंडकडून 20 धावांनी पराभव स्विकारावा लागला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हॅट्ट्रीक! आयर्लंडच्या जोशुआ लिटलने उधवस्त केली न्यूझीलंडची मिडल ऑर्डर, ठरला सहावाच गोलंदाज
पुणेरी पलटणचा कर्णधार फझेल अत्राचलीने मानले चाहत्यांचे आभार! म्हणाला,’ आम्हाला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियमवर…’