टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेचा महाकुंभमेळा ऑस्ट्रेलियात सुरू असून आता शेवटाकडे जात आहे. भारतीय संघ या स्पर्धेत उत्तम कामगिरी करत गुणतालिकेत अव्वलस्थानी आहे. मागील काही वर्षांमध्ये खराब फॉर्मशी झगडल्यानंतर आता भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली सातत्याने शानदार कामगिरी करत आहे. विराटने या स्पर्धेत 4 सामने खेळताना 3 अर्धशतके झळकावली आहेत. विराटच्या या शानदार कामगिरीबद्दल भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांनी विराट आणि सचिन तेंडुलकर यांची रंजक तुलना केली आहे.
बीडच्या संजय बांगर यांनी सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांची तुलना केली. याबद्दल स्टार स्पोर्ट्सशी बोलताना त्यांनी म्हटले की, “सर्व महान फलंदाज या स्पर्धेकडे मोठ्या सामन्याप्रमाणे पाहतात. जेव्हा सर्व जगाचे लक्ष त्यांच्यावर असते, तेव्हा त्यांना शानदार कामगिरी करण्यास आवडते. ही स्पर्धा त्यांना आपला खेळ सुधारण्याची संधी देते. आम्ही पाहिले की, आधी आम्ही सचिन तेंडुलकरसोबत खेळायचो, पण आता आम्ही विराट कोहलीसोबत खेळत आहोत.”
पुढे बोलताना बांगर म्हणाले की, “आपल्या पहिल्या विश्वचषकात विराट संघाचा भाग होता, पण तो संघातील मुख्य खेळाडू नव्हता. त्यानंतर भारतीय संघ पूर्णपणे विराट कोहलीवर खूप अवलंबून आहे. विराट जर दीर्घकाळ खेळला, तर निश्चितच सर्व रेकॉर्ड तुटणार आहेत.”
विशेष म्हणजे, भारतीय संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर 1996, 2003 आणि 2011 सालच्या या वनडे विश्वचषकांमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने सन 2011च्या विश्वचषकात भारतीय संघासाठी महत्त्वाची भूमिका साकारली होती. सचिनने वनडे कारकीर्दीतील 452 डावांमध्ये एकूण 18426 धावा चोपल्या आहेत. यादरम्यान त्याने 49 शतके झळकावली आहेत. दुसरीकडे, विराटने 2011च्या विश्वचषकात भारतीय संघाकडून पदार्पण केले होते. विशेष म्हणजे, हे सचिनचे शेवटचे विश्वचषक होते.
विराटच्या टी20 विश्वचषक 2022मधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत खेळलेल्या 4 सामन्यात 220च्या सरासरीने 220 धावा चोपल्या आहेत. यासह तो या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. यादरम्यान तो 3 वेळा नाबादही राहिला आहे. त्याची या विश्वचषकातील सर्वोच्च धावसंख्या ही नाबाद 82 इतकी आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
किवी संघाची टी20 विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये सुपर एंट्री, न्यूझीलंडचा आयर्लंडवर 35 धावांनी विजय
हॅट्ट्रीक! आयर्लंडच्या जोशुआ लिटलने उधवस्त केली न्यूझीलंडची मिडल ऑर्डर, ठरला सहावाच गोलंदाज