---Advertisement---

कसोटी क्रमवारीत न्यूझीलंडचा डंका! इंग्लंडविरुद्धच्या मालिका विजयाने गाठले ‘हे’ स्थान

On: रविवार, जून 13, 2021 6:39 PM
---Advertisement---

न्यूझीलंड संघ सध्या इंग्लंड दौर्‍यावर असून उभय संघांमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात आली. यातील पहिला सामना लॉर्डसच्या मैदानावर खेळवण्यात आला होता. जो अनिर्णीत अवस्थेत संपला होता. मात्र त्यानंतर एजबस्टनच्या मैदानावर खेळवल्या गेलेल्या दुसर्‍या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडवर ८ गडी राखून विजय मिळवला. यासह दोन सामन्यांची कसोटी मालिका १-० अशा फरकाने खिशात घातली.

या मालिकेनंतर आता न्यूझीलंडच्या संघाला १८ ते २२ जून दरम्यान भारतीय संघाविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. मात्र या सामन्यापूर्वी त्यांना एक खुशखबर मिळाली आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिका विजयाने जागतिक कसोटी क्रमवारीत त्यांनी अव्वल स्थानी झेप घेतली आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेपूर्वी हे वृत्त आल्याने न्यूझीलंडच्या संघाचे मनोबल नक्कीच उंचावले असेल.

न्यूझीलंड अव्वल तर भारत दुसर्‍या स्थानी
जागतिक कसोटी क्रमवारीत भारतीय संघ यापूर्वी अव्वल स्थानी होता. मात्र आता न्यूझीलंडने या विजयामुळे त्यांना मागे टाकत अव्वल स्थान काबीज केले आहे. त्यामुळे भारतीय संघ सध्या दुसर्‍या स्थानी विराजमान आहे. मात्र या क्रमवारीपेक्षा दोन्ही संघाचे लक्ष्य आता पहिल्यावाहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्याचे असेल. १८ ते २२ जून दरम्यान साउथम्पटनच्या मैदानावरील सामन्याने या विजयी संघाचा फैसला होईल. न्यूझीलंड संघाने नुकताच इंग्लंडवर विजय मिळवल्याने त्यांचा आत्मविश्वास या सामन्यासाठी दुणावलेला असेल. तर दुसरीकडे त्यांना कडवी टक्कर देण्यासाठी गेली काही वर्षे सातत्याने कसोटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणारा भारतीय संघ उत्सुक असेल.

न्यूझीलंडने तिसर्‍यांदा इंग्लंडमध्ये मिळवला मालिका विजय
दरम्यान न्यूझीलंड संघाचा हा इंग्लंडमधील तिसरा मालिका विजय ठरला. जवळपास २२ वर्षांनंतर त्यांना इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्यात यश आले. यापूर्वी त्यांनी १९९९ साली स्टीफन फ्लेमिंगच्या नेतृत्वाखाली इंग्लंडमधील शेवटचा कसोटी मालिका विजय मिळवला होता. तर इंग्लंडला सात वर्षांनंतर मायदेशात कसोटी मालिका गमावण्याची नामुष्की पत्करावी लागली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

टी२० क्रिकेट मोठं झालं! १८ वर्षांपूर्वी या दोन संघांत खेळला गेला होता पहिला टी२० सामना

ढाका प्रीमियर लीगच्या अधिकाऱ्यांवर हल्ला, पोलीस आणि कर्मचाऱ्यांच्या वादात अधिकारी जखमी

इंग्लंड संघाची या महत्त्वाच्या टी२० मालिकेसाठी घोषणा, ६ वर्षांनंतर ‘या’ खेळाडूचे झाले पुनरागमन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---