कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे हाताला काम नसल्याने अनेक लोक संकटात सापडले आहेत. हाती पैसा नसल्यामुळे अनेकांची उपासमार होत आहे. अशा या नैसर्गिक संकटात न्यूझीलंडचा एक माजी दिग्गज खेळाडू सापडला आहे. स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते रस्त्यांवरती 13 तास काम करताहेत. आपले कुटुंब चालवण्यासाठी ते रस्त्यांवरती बसून चिप्स विकत आहेत.
अचाट आकडेवारी
बलाढय़ संघाविरुद्ध भन्नाट गोलंदाजी करत आपल्या संघाला एकहाती सामने मिळवून देणारे एविन चॅटफील्ड संघर्ष करताना दिसून येत आहेत. 70 वर्षीय एव्हिन चॅटफील्ड यांनी न्यूझीलंडकडून खेळताना 43 कसोटी सामन्यात 180 बळी घेतले. तर 114 एकदिवसीय सामन्यात त्यांच्या नावावर 118 बळींची नोंद आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याबरोबरच स्थानिक सामन्यातही त्यांचा दबदबा होता. न्यूझीलंडमध्ये 157 प्रथम श्रेणी सामने तसेच अ दर्जाच्या 171 सामन्यात एकूण 809 बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. एव्हिन चॅटफील्ड यांची ही अचाट करणारी आकडेवारी आहे.
चेतन शर्माने विश्वचषकात याच खेळाडूला बाद करत घेतली होती हॅट्रिक
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज चेतन शर्माने १९८७ विश्वचषकात केन रुदरफोर्ड, इयान स्मिथ व एव्हिन चॅटफील्ड या खेळाडूंना बाद करत वनडेत हॅट्रिकचा कारनामा केला होता. तेव्हा चेतन शर्मा भारताकडून हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरला होता.
कुरिअर बॉय म्हणूनही केले काम
आपल्या देशाकडून दीर्घ काळ क्रिकेट खेळत आणि चांगली कामगिरी करूनही अशी परिस्थिती ओढवलेल्या या क्रिकेटपटूबद्दल अनेकांना वाईट वाटतयं. आपल्या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर फलंदाजाला नाचवणारे एव्हिन क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांची आर्थिक परिस्थिती ढासळू लागली. निवृत्तीनंतर त्यांनी विविध कंपनीत काम करण्यास सुरुवात केली. पुढे एका चिप्सच्या कारखान्यात ते काम करताना दिसून आले. चार्ट फिल्ड यांनी डिलिव्हरी बॉय पासून ते कुरिअर बॉय म्हणून देखील काम केले आहे. तर काही वेळ कॅब चालविण्याचे काम केले.
वेस्ट इंडीजच्या फलंदाजांची पळता भुई
आपल्या कारकीर्दीत वेग आणि अचूक स्विंग साठी प्रसिद्ध असलेले एव्हिन यांनी विश्वविजेता वेस्ट इंडीजच्या संघाची चांगलीच दमछाक केली होती. वेस्ट इंडिजविरुद्धच्या एका सामन्यात चॅटफिल्ड यांनी भेदक गोलंदाजी करुन पहिल्या डावात सहा तर दुसऱ्या डावात सात गडी बाद करून सामना तीन दिवसांत संपवला. या सामन्यात त्यांच्या गोलंदाजीपुढे फलंदाजांची पळताभुई झाली होती.
इंग्लंड, ऑस्ट्रेलियाला पाजले पाणी
विरोधी संघात त्यांच्या नावाचा एक जबरदस्त धाक होता. आपल्या कारकिर्दीत न्यूझीलंड संघातील महत्त्वाचा खेळाडू होते. त्यांच्या जीवावरच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघांना त्यांच्याच घरात पाणी पाजत मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. त्या काळात ही सर्वोत्तम कामगिरी मानली गेली.
Happy birthday, Ewen Chatfield!
Chatfield represented New Zealand in 43 Tests and 114 ODIs, taking 263 international wickets. pic.twitter.com/VBcQ9KDii4
— ICC (@ICC) July 3, 2019
दुखापतीनंतरही खेळले चौदा वर्षे क्रिकेट
इंग्लंडविरुद्धच्या एका सामन्यात 11व्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्यांच्या डोक्याला दुखापत झाली तेव्हा इंग्लंडच्या फिजिओने मैदानात मदतीसाठी धावत येऊन त्यांचे प्राण वाचवले. या घटनेनंतरही पुढे चौदा वर्षे क्रिकेट खेळले. अखेर फेब्रुवारी 1989 साली त्यांनी शेवटचा सामना खेळून क्रिकेटला रामराम ठोकला.