न्यूझीलंडचा धाकड अष्टपैलू कॉलिन डी ग्रँडहोम याने बुधवारी (31 ऑगस्ट) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 36 वर्षीय ग्रँडहोमने न्यूझीलंड क्रिकेटशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. ग्रँडहोमला नुकतेच न्यूझीलंड क्रिकेटने त्यांच्या केंद्रिय करारातून मुक्त केले होते. ग्रँडहोमने जून 2022 मध्ये न्यूझीलंड संघाकडून शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर सातत्याने दुखापतींमुळे तो जास्त सामन्यांसाठी उपलब्ध राहू शकला नाही.
निवृत्ती जाहीर करताना डी ग्रँडहोम (Collin De Grandhomme) म्हणाला की, “मी मान्य करतो की माझे आता वय वाढत आहे. त्यामुळे मला आता सराव करणे अवघड बनत चालले आहे. त्यातही दुखापतींमुळे मी त्रासलो आहे, म्हणून तर गोष्टी आणखी कठीण बनत आहेत. माझे वाढते कुटुंब माझ्यामागे आहे. क्रिकेट सोडल्यानंतर माझे भविष्य काय असेल, याचा मला अंदाज आहे. गेल्या काही आठवड्यांपासून मी याचा विचार करत आहे.”
“2012 मध्ये पदार्पण केल्यानंतर न्यूझीलंडकडून इतके क्रिकेट खेळायला मिळाले यासाठी मी स्वत:ला नशीबवान समजतो. मला माझ्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचाही अभिमान आहे. पण मला वाटते की, थांबण्याची हीच योग्य वेळ आहे”, असेही त्याने म्हटले आहे.
BLACKCAPS and @ndcricket all-rounder Colin de Grandhomme has announced his retirement from international cricket. #CricketNation https://t.co/IfY45v2Wbj
— BLACKCAPS (@BLACKCAPS) August 31, 2022
डी ग्रँडहोमची (Collin De Grandhomme Retires) आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द प्रभावी राहिली आहे. त्यातही त्याचे कसोटी क्रिकेटमधील आकडे उल्लेखनीय आहेत. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 29 सामने खेळताना 38.7 च्या सरासरीने 1432 धावा काढल्या आहेत. यामध्ये त्याच्या 2 शतकांचा समावेश आहे, जी त्याने वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकाविरुद्ध केली होती. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना त्याने 49 विकेट्सही घेतल्या आहेत. यामध्ये पाकिस्तानविरुद्ध पदार्पण करताना 41 धावा देत त्याने घेतलेल्या 6 विकेट्सचाही समावेश आहे.
याशिवाय वनडे आणि टी20 क्रिकेटमध्येही त्याचे आकडे चांगले राहिले आहेत. त्याने न्यूझीलंडकडून 45 वनडे आणि 41 टी20 सामने खेळले आहेत. 45 वनडे सामन्यात त्याने 742 धावा आणि 30 विकेट्सची कामगिरी केली आहे. तर टी20 क्रिकेटमध्ये 41 सामन्यात 503 धावा आणि 12 विकेट्स घेतल्या आहेत.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
वाढदिवस विशेष- भारताचा दिग्गज गोलंदाज जवागल श्रीनाथबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी
एकेकाळी काट्याची टक्कर देणाऱ्या हाँगकाँगविरुद्ध भारत करणार प्रयोग! अशी असेल प्लेइंग इलेव्हन
वर्ष १९८० मध्येच प्रणवदांना मिळाली होती बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची ऑफर