भारतीय संघ टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात पराभूत झाला. पराभवानंतर भारतीय संघावर आजी-माजी दिग्गजांनी तसेच क्रिकेट चाहत्यांनी आणि इतर संघांच्या माजी खेळाडूंनी सडकून टीका केली. मात्र, या सर्वांव्यतिरिक्त न्यूझीलंड क्रिकेट संघाचे माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग यांनी भारतीय संघाच्या सुधारासाठी मोलाचा सल्ला दिला आहे. काय म्हणालेत फ्लेमिंग चला जाणून घेऊया…
स्टीफन फ्लेमिंग (Stephen Fleming) यांनी भारतीय संघाला दबावाचा सामना करण्यासाठी काय केले पाहिजे, हे सांगितले आहे. त्यांच्यानुसार, भारतीय संघाने अशा खेळाडूंना ताफ्यात सामील केले पाहिजे, जे दबावात उत्तमरीत्या खेळू शकतात. यासाठी संघ व्यवस्थापनाला धाडसी निर्णय घ्यावे लागतील.
काय म्हणाले फ्लेमिंग?
स्टीफन फ्लेमिंग यांच्यानुसार, भारतीय संघाने आपल्या निवडीमध्ये असे निर्णय घेतले पाहिजे, जे खूप धाडसी असतील. संघाला योग्य दृष्टीकोन स्वीकारावा लागेल. माध्यमांशी बोलताना फ्लेमिंग म्हणाले की, “तुम्हाला निवडीत जोखीम पत्करावी लागेल. जो खेळाडू जोखीम घेऊ शकेल आणि इतर खेळाडूंवरील दबाव कमी करू शकेल, अशा खेळाडूंना संघात सामील करावे लागेल. कदाचित, यासाठी तुम्हाला तुमचा संघ पूर्णपणे बदलावा लागेल. जर इंग्लंड विजय मिळवत असेल, तर हे मोठे उदाहरण असेल की, कशाप्रकारे त्यांनी आपल्या खेळात बदल करून यश मिळवले.”
पुढे बोलताना ते म्हणाले की, “प्रतिभेची कोणताही कमतरता नाहीये. फक्त योग्य खेळाडूंना योग्य ठिकाणी ठेवून योग्य दृष्टीकोनाची गरज आहे. अनेक संघ असे आहेत, जे यामुळे मागे राहून जातात. कारण, ते जास्त जोखीम घेत नाहीयेत. आता तर हा खेळ खूप पुढे गेला आहे.”
भारतीय संघाचा टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेतील प्रवास निराशाजनक पराभवाने संपुष्टात आला. पुन्हा एकदा बाद फेरीचा दबाव भारतीय संघाला पेलता आला नाही आणि त्यांना पराभूत होत स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. आतापर्यंतच्या सर्व बाद फेरीत भारतीय संघाची दाणादाण उडत आहे. यावरून समजते की, दबावाच्या स्थितीत भारतीय संघ पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे ढासळतो. 2014पासून आतापर्यंत हे घडताना दिसत आहे. संघ बाद फेरीत येऊन पराभव पत्करतो आणि संघाचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पुन्हा भंगते. (New Zealand former captain Stephen Fleming advice to Team India for knockout games)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऋतुराजच्या शतकाने महाराष्ट्राची विजय हजारे ट्रॉफीत दमदार सलामी; मुंबईसाठी रहाणे चमकला
आता आयसीसीतही वाढले जय शहांच वजन! महत्त्वाचं खातं पडलंय पदरात