मुंबई । न्यूझीलंड क्रिकेटच्या संघात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कर्णधार केन विल्यमसन याला कर्णधार पदावरून दूर करण्यात येणार असल्याच्या बातम्या येत आहेत. विलियम्सन याला कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून दूर करण्यासाठी प्रशिक्षक गॅरी स्टेड यांचा हात असल्याचे बोलले जाते आहे. मात्र प्रशिक्षक स्टीड यांनी या बातम्या चुकीच्या असल्याचे सांगितले.
ते म्हणाले,”केन विल्यमसन आणि माझ्यातील संबंध चांगले आहेत. त्याला कर्णधारपदावरून दूर करण्याच्या चुकीच्या बातम्या येत आहेत.” या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला 0-3 अशा फरकाने हरवले होते, तेव्हापासून या बातम्या येत आहेत. स्टीड यांनी कसोटी कर्णधार म्हणून विल्यम्सनच्या जागेवर डाव्या हाताने फलंदाजी करणारा टॉम लॅथम याला पसंती दिली होती.
“केन विल्यम्सनच्या कामगिरीवर आमची नजर आहे. तो एक शानदार खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत चांगले नेतृत्व करत संघाला एक दिशा दिली आहे. मला विश्वास आहे की, भविष्यातही तोच कर्णधार राहील,” असे स्टीड यांनी सांगितले.
“एक खेळाडू म्हणून तो मला खूप आवडतो. तो सिद्धांतावर काम करणारा व्यक्ती आहे. संघासाठी खूप काही नव्या गोष्टी घेऊन येतो. त्याच्या आणि माझ्या विचारांमध्ये खूप फरक आहे,”असेही स्टीड यांनी नमूद केले.
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानेही केन विल्यमसन याला कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून दूर करण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला नाही. मागील वर्षी लॉर्ड्सवर झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव झाला होता. जास्त बाऊंड्री ठोकण्याच्या नियमानुसार इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले होते. तेव्हा न्यूझीलंडच्या संघाचे नेतृत्व केन विल्यम्सन करत होता.