---Advertisement---

विलियम्सन आयसीसी स्पर्धेतील सर्वात यशस्वी ‘किवी कर्णधार’! न्यूझीलंडला ‘इतक्यांदा’ पोहचवलंय फायनलमध्ये

On: गुरूवार, नोव्हेंबर 11, 2021 1:45 AM
---Advertisement---

टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचणारा पहिला संघ बुधवारी (१० नोव्हेंबर) निश्चित झाला. बुधवारी ग्रुप एकमधील इंग्लंड आणि ग्रुप दोनमधील न्यूझीलंड यांच्यात पहिला उपांत्य सामना खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडला पाच विकेट्स राखून पराभवाचे पाणी पाजले. कर्णधार केन विलियम्सच्या नेतृत्वात न्यूझीलंडने कमाल प्रदर्शन केले या रोमांचक सामन्यात विजय मिळवून अंतिम सामन्यात स्थान पक्के केले आहे.

इंग्लंडवर मिळवलेल्या या विजयानंतर कर्णधार केन विलियम्सन आयसीसी स्पर्धेत न्यूझीलंडला सर्वाधिक वेळा अंतिम सामन्यात पोहोचवणारा कर्णधार ठरला आहे.

कर्णधार केन विलियम्सनने यापूर्वी दोन वेळा न्यूझीलंडला आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचवले होते. त्यानंतर आता ही सलग तिसरी वेळ आहे, जेव्हा न्यूझीलंड विलियम्सनच्या नेतृत्वात एखाद्या आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे.

विलियम्सनने यापूर्वी २०१९ मध्ये विश्वचषक आणि २०१९-२१ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद या दोन आयसीसी स्पर्धांमध्ये न्यूझीलंडला अंतिम सामन्यात पोहोचवले होते. त्यानंतर आता यावर्षी खेळल्या जाणाऱ्या आयसीसी टी२० विश्वचषकातही न्यूझीलंड त्याच्या नेतृत्वात अंतिम सामन्यात पोहोचला आहे.

याचसोबत विलियम्सन असा कर्णधार बनला आहे, ज्याने न्यूझीलंडला सर्वाधिक वेळा आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचवले आहे. या यादीस दुसऱ्या स्थानावर ब्रेंडन मॅक्युलम आहे, ज्यांच्या नेतृत्वात न्यूझीलंड २ वेळा आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचला होता. तिसऱ्या क्रमांकावर स्टीफन फ्लेमिंग आहे, ज्यांनी त्यांच्या नेतृत्वात एकदा आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाला पोहोचवले आहे.

विलियम्सनने आत्तापर्यंत ५ आयसीसी स्पर्धांमध्ये न्यूझीलंडचे नेतृत्व केले आहे. यामध्ये २०१६ चा टी२० विश्वचषक आणि २०१७ ची चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धांचाही समावेश आहे. यातील २०१६ सालच्या टी२० विश्वचषकात न्यूझीलंड उपांत्य फेरीत पराभूत झाला होता. तर, २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न्यूझीलंडचे आव्हान साखळी फेरीतच संपले होते. पण त्यानंतर झालेल्या तिन्ही आयसीसी स्पर्धेत न्यूझीलंडचा संघ विलियम्सनच्या नेतृत्वाखाली अंतिम फेरीत पोहचला आहे. यात २०१९-२१ च्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपदही न्यूझीलंडने भारतीय संघाला पराभूत करत जिंकले होते.

दरम्यान, बुधवारी न्यूझीलंडने उपांत्य सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम इंग्लंडला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले होते. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४ विकेट्सच्या नुकसानावर १६६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने ५ विकेट्सच्या नुकसानावर आणि १९ षटकात हे लक्ष्य गाठले.

न्यूझीलंडच्या डॅरिल मिशेलने या सामन्यात ४७ चेंडूत नाबाद ७२ धावा केल्या आणि त्याला या कामगिरीसाठी सामनावीर निवडण्यात आहे. त्याच्याशिवाय जेम्स निशामने ११ चेंडूत २७ धावांची आणि डेवॉन कॉनवेने ३८ चेंडूत ४६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

इंग्लंडच्या लियम लिविंगस्टोन आणि क्रिस वोक्स या दोघांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या, पण ते न्यूझीलंडला १६६ धावांच्या आत रोखू शकले नाहीत. परिणामी न्यूझीलंडने विजय मिळवून अंतिम सामना गाठला आणि इंग्लंडचा टी२० विश्वचषकातील प्रवास संपुष्टात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

बुमराहचा शास्त्री आणि सपोर्ट स्टाफला भावनिक निरोप; म्हणाला, ‘आधार, प्रेरणा, प्रोत्साहनाच्या शब्दांसाठी…’

सेहवाग आणि धोनीने घेतलेल्या ‘त्या’ निर्णयाने वाचली विराटची कारकीर्द? वाचा काय घडले होते

वेंकटेश अय्यरला विराटने काय दिला होता खास सल्ला? अष्टपैलूने केलाय खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---