तुम्ही कधीच ऐकल नसेल की एखाद्या क्रिकेटपटूने दहाव्या क्रमांकावर फलंदाजी करत प्रथमश्रेणी कारकिर्दीची सुरुवात केली आणि नंतर तो आंतरराष्ट्रीय कसोटीमध्ये देशासाठी सलामीवीर म्हणून खेळला. न्यूझीलंडच्या मार्क रिचर्डसन यांनी हा करिश्मा केला होता. आज त्यांचा ५० वा वाढदिवस आहे. रिचर्डसन यांनी ऑकलंडकडून प्रथमश्रेणी क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा ते डावखुरा फिरकी गोलंदाज म्हणून खेळत असत. तसेच फलंदाजी दहाव्या क्रमांकावर करत. मात्र, आजारपणामुळे त्यांनी गोलंदाजीकडून फलंदाजीकडे आपले लक्ष केंद्रित केले आणि नंतर कसोटी क्रिकेटमध्ये न्यूझीलंडकडून सलामीवीर म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली.
वयाच्या तिसाव्या वर्षी केले पदार्पण
रिचर्डसन यांनी जेव्हा न्यूझीलंडकडून कसोटी सामन्यात पदार्पण केले तेव्हा ते ३० वर्षांचे होते आणि वयाच्या ३४ व्या वर्षी त्यांनी आपला अखेरचा कसोटी खेळला. म्हणजेच ते फक्त ४ वर्षे कसोटी क्रिकेट खेळले. परंतु, या चार वर्षांतही त्यांनी आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. न्यूझीलंडकडून त्यांनी ३८ कसोटी सामन्यात ४५ च्या सरासरीने २७७६ धावा केल्या. त्याचवेळी, रिचर्डसन ४ वनडे सामन्यात केवळ ४२ धावा बनवू शकले. सध्या ते स्काय स्पोर्ट्स न्यूझीलंडसाठी समालोचन करतात.
अखेर पहिले कसोटी शतक आले
रिचर्डसन यांनी सन २००० मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. पहिल्या सामन्यात ते १९ धावा काढून बाद झाले. मात्र, हरारे येथे झालेल्या दुसर्या कसोटी सामन्यात ते अवघ्या एका धावेने शतकापासून वंचित राहिले. त्यानंतरही त्यांनी अनेक अर्धशतके झळकावली. परंतु, त्यांचे शतक होत नव्हते. अखेर, ६ कसोटीनंतर त्यांची इच्छा पूर्ण झाली आणि २००१ मध्ये त्यांनी पाकिस्तानविरुद्ध हॅमिल्टन कसोटीत पहिले कसोटी शतक ठोकले.
भारताविरुद्ध उभारली सर्वात मोठी धावसंख्या
रिचर्डसन यांनी त्यानंतर आणखी तीन शतके ठोकली. एक बांगलादेशविरुद्ध, एक भारताविरुद्ध आणि एक इंग्लंडविरुद्ध. २००३ मध्ये मोहाली कसोटीत त्यांनी भारताविरुद्धच्या कसोटीत १४५ धावांची कारकिर्दीतील सर्वात मोठी खेळी खेळली. या कसोटीत न्यूझीलंडच्या अन्य तीन फलंदाजांनीही शतके झळकावली होती. यामध्ये लू विन्सेट (१०६), स्कॉट स्टायरिस (११९) आणि क्रेग मॅकमिलन (१००) यांचा समावेश होता. न्यूझीलंडने या डावात ६ गड्यांच्या मोबदल्यात ६३० धावांत डाव घोषित केला होता. परदेशात न्यूझीलंड संघाची ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे.
आणि वॉर्न कारकीर्दीत शतक ठोकू शकला नाही
रिचर्डसन यांनी शेन वॉर्नला कसोटी कारकिर्दीत शतक ठोकण्यापासून वजन ठेवले होते. २००० साली झालेल्या सिडनी कसोटी सामन्यात वॉर्न ९९ धावांवर खेळत असताना डॅनिएल व्हेटोरीच्या चेंडूवर रिचर्डसनने त्याचा झेल टिपला. वॉर्नची कसोटी कारकीर्दीतील ही सर्वोच्च धावसंख्या होती. यानंतर, वॉर्न कधीही या आकड्याच्या आसपास गेला नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
‘सबका बदला लेगा तेरा व्हाइट वॉकर!’, अश्विनच्या ‘त्या’ ट्विटवर जाफरचा भन्नाट रिप्लाय
किती हा राग? एकाच सामन्यात दोन वेळा सुटला शाकिबचा संयम, रागाच्या भरात उखडले स्टंप्स
भारतीय संघात प्रथमच निवड झालेल्या ऋतुराज गायकवाडने केले धोनीचे कौतुक, सांगितली ‘ही’ गोष्ट