न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा दारुण पराभव झाला. या सामन्यात न्यूझीलंडला विजासाठी केवळ 107 धावांचं लक्ष्य मिळालं होतं. किवी संघानं हे लक्ष्य 2 विकेट गमावून सहज गाठलं.
बंगळुरू कसोटीत विजय मिळवल्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम यानं एक रोचक खुलासा केला. या सामन्यात नाणेफेक हरल्यामुळे आम्ही रोहितसारखी चूक टाळली, असं लॅथमनं सांगितलं. पावसामुळे सामन्याच्या पहिल्या दिवशी एकाही चेंडूचा खेळ झाला नव्हता. दुसऱ्या दिवशी रोहितनं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय सपशेल चुकीचा ठरला. रोहितनं स्वतः ही चूक मान्य केली. भारताचा पहिला डाव अवघ्या 46 धावांवर आटोपला, ज्यामध्ये पाच खेळाडू शून्यावर तंबूत परतले. प्रत्युत्तरात, न्यूझीलंडनं पहिल्या डावात 402 धावा करत भक्कम आघाडी घेतली.
पहिली कसोटी जिंकल्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम म्हणाला, “आम्ही देखील प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ असा विचार केला होता. आम्ही नाणेफेक गमावली हे चांगलं झालं. आम्ही बराच वेळ योग्य ठिकाणी चेंडू टाकले, ज्याचा फायदा आम्हाला मिळाला. भारत तिसऱ्या डावात पुनरागमन करेल हे आम्हाला माहीत होतं. परंतु गोलंदाजांनी दुसऱ्या नव्या चेंडूवर चांगली गोलंदाजी केली.”
टॉम लॅथमनं आठव्या विकेटसाठी 137 धावांची भागीदारी करणाऱ्या रचिन रवींद्र (134) आणि टिम साऊदी (65) यांचंही कौतुक केलं. न्यूझीलंडचा कर्णधार म्हणाला, “मला वाटतं की रचिन आणि साऊदी यांच्यातील भागीदारी आम्हाला अशा वेळी पुढे घेऊन गेली, जेव्हा खेळ संतुलित वाटत होता. साऊदीकडे बॅटनं धावा करण्याची क्षमता आहे हे आम्हाला माहीत होतं. रचिननं गेल्या 12 महिन्यांत नवीन भूमिकेशी जुळवून घेतलंय.”
रचिन रवींद्रनं पहिल्या डावात आपला क्लास दाखवत शानदार शतक झळकावलं. तो दुसऱ्या डावात पुन्हा शानदार फलंदाजी करत 39 धावा करून नाबाद राहिला. या कामगिरीसाठी त्याला सामनावीरचा पुरस्कार मिळाला. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना 24 ऑक्टोबरपासून पुण्यात खेळला जाणार आहे.
हेही वाचा –
पहिल्या कसोटीतील पराभवानंतर हे तीन भारतीय खेळाडू होऊ शकतात दुसऱ्या सामन्यातून बाहेर
रिषभ पंत पुणे कसोटीतून बाहेर? रोहित शर्मानं दिली मोठी हिंट; जाणून घ्या काय म्हणाला हिटमॅन?
IND VS NZ; टीम इंडियाच्या लाजिरवाण्या पराभवाने किवी संघाचा विजयाचा दुष्काळ संपला!