एका पार्ट टाईम क्रिकेटरनं टीम इंडियाला गुडघे टेकण्यास भाग पाडलं, असं जर आम्ही तुम्हाला सांगितलं तर कदाचित तुमचा यावर विश्वास बसणार नाही, परंतु असं खरंच घडलं आहे! पुण्यात खेळल्या गेलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात स्वत:ला पार्ट टाईम क्रिकेटर म्हणवणाऱ्या एका गोलंदाजानं भारतीय फलंदाजांची ऐसी की तैसी करून टाकली. आम्ही बोलत आहोत न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज मिचेल सँटनरबद्दल.
न्यूझीलंडचा स्टार फिरकीपटू मिचेल सँटनर यानं टीम इंडियाविरुद्ध पुण्यात खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या कसोटीत एकूण 13 बळी घेतले. त्यानं पहिल्या डावात 7 तर दुसऱ्या डावात 6 बळी घेतले. जर आपण सँटनरच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर नजर टाकली तर, त्याच्या बायोमध्ये त्यानं स्वतःला ‘पार्ट टाइम क्रिकेटर’ आणि ‘फुल टाइम गोल्फर’ असं म्हटलं आहे. त्याच्या बायोमध्ये लिहिलेली ही गोष्ट खरोखरच धक्कादायक आहे.
म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की, पार्ट टाईम क्रिकेट खेळणाऱ्या एका गोल्फरनं पुणे कसोटीत टीम इंडियाच्या फलंदाजांना नांगी टाकण्यास भाग पाडलं. या सामन्यात 13 बळी घेणाऱ्या सँटनरला ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा किताब देण्यात आला. या विजयासह न्यूझीलंडच्या संघानं भारतात प्रथमच कसोटी मालिका जिंकली आहे.
मिचेल सँटनर जरी स्वत:ला पार्ट टाईम क्रिकेटर म्हणत असला, तरी तो न्यूझीलंडकडून तिन्ही फॉरमॅट खेळतो. या फिरकीपटूनं 2015 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्यानं आतापर्यंत 29 कसोटी, 104 एकदिवसीय आणि 104 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. सँटनरनं कसोटीच्या 49 डावांत 67 विकेट घेतल्या आणि 41 डावांत 941 धावा केल्या. याशिवाय त्यानं एकदिवसीय सामन्यांच्या 99 डावात 107 विकेट घेतल्या आणि 78 डावात 1355 धावा केल्या. टी20 इंटरनॅशनलच्या 102 डावांमध्ये सँटनरनं 115 विकेट घेतल्या आणि 70 डावात फलंदाजी करताना 675 धावा केल्या.
हेही वाचा –
“भारतीय संघ आपल्याच जाळ्यात अडकला”, पुणे कसोटीतील पराभवानंतर दिग्गजाच्या टीम मॅनेजमेंटला कानपिचक्या
फिरकींसमोर टीम इंडिया नतमस्तक, स्पीन खेळण्यात भारत बांग्लादेशपेक्षाही मागे; पाहा आकडेवारी
“जसप्रीत बुमराहला तिसऱ्या कसोटीतून वगळण्यात यावं”, माजी भारतीय खेळाडूचा सल्ला