---Advertisement---

बांग्लादेशविरूद्धच्या मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर, विलियम्सनच्या अनुपस्थितीत ‘या’ खेळाडूकडे नेतृत्वाची धुरा

---Advertisement---

बांग्लादेशविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडच्या संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली. या मालिकेत न्यूझीलंड संघाचा नियमित कर्णधार केन विलियम्सन कोपराच्या दुखापतीमुळे उपलब्ध नसेल. त्यामुळे अनुभवी टॉम लॅथमकडे या मालिकेसाठी न्यूझीलंडचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. तसेच काही नवोदित चेहऱ्यांचाही या संघात समावेश झाला आहे.

तीन नवोदित खेळाडूंना संधी 

न्यूझीलंडने या मालिकेसाठी डेवॉन कॉन्वे, विल यंग आणि डॅरेल मिचेल या तीन युवा खेळाडूंना पहिल्यांदाच संधी दिली आहे. यापैकी डेवॉन कॉन्वेने आपले टी२० पदार्पण मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध केले होते. नुकत्याच संपलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी२० मालिकेत त्याने ९९ धावांची शानदार खेळी केली होती. याच कामगिरीचे फळ म्हणून त्याला वनडे संघात स्थान देण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे विल यंगने २०१९ मध्ये न्यूझीलंड ‘अ’ संघाकडून खेळतांना ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्ध दोन वनडे शतके झळकावली होती. त्यांनतर खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे तो काही काळ क्रिकेटपासून दूर होता. मात्र आता त्याचेही पुनरागमन झाले आहे. त्याने यापूर्वी न्यूझीलंडतर्फे दोन कसोटी सामने खेळले आहेत.

मार्टिन गुप्तील पूर्ण फिट 

या मालिकेसाठी न्यूझीलंडचा अनुभवी सलामीवीर मार्टिन गुप्तील पूर्णपणे फिट झाला आहे. मात्र अष्टपैलू कॉलिन डी ग्रँडहोम दुखापतीतून अद्याप सावरला नसल्याने त्याचा संघात समावेश करण्यात आला नाही. तसेच वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनलाही या संघात स्थान देण्यात आले नाही.

न्यूझीलंडचा संपूर्ण संघ – 

ट्रेंट बोल्ट, डेवॉन कॉन्वे, मार्टिन गुप्तील, मॅट हेनरी, काइले जेमिसन, टॉम लॅथम (कर्णधार व यष्टीरक्षक), डॅरेल मिचेल, जिमी नीशम, हेनरी निकोल्स, मिचेल सँटेनर, टिम साउदी, रॉस टेलर आणि विल यंग.

बांग्लादेश आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेला येत्या २० मार्चपासून प्रारंभ होईल. वनडे मालिकेनंतर उभय संघांमध्ये तीन टी२० सामन्यांची मालिकाही खेळवली जाईल. या वनडे मालिकेद्वारे न्यूझीलंडचा संघ २०२३च्या वनडे विश्वाचषकाच्या तयारीला प्रारंभ करेल, असे न्यूझीलंडच्या निवडकर्त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या:

वाढदिवस विशेष : कॅरम बॉलचा जनक अजंथा मेंडिस

आयपीएल सुरू होण्यापूर्वीच आरसीबीला मोठा धक्का! या खेळाडूने घेतली संपूर्ण स्पर्धेतून माघार

रिषभ पंत नव्हे तर, या खेळाडूला पहिल्या टी२० सामन्यात कोहली देणार यष्टीरक्षक म्हणून संधी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---