आंतरराष्ट्रीय क्रिकेटला भारतीय उपखंडाने नेहमीच अत्यंत दर्जेदार फिरकीपटू दिले आहेत. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि आता अफगाणिस्तान हे सर्व देश आपल्या एकाहून एक सरस फिरकीपटूंसाठी प्रसिद्ध आहेत. त्यापैकीच एक देश म्हणजे श्रीलंका. श्रीलंकेने ही आजवर काही मोजकेच परंतु अत्यंत प्रभावशाली फिरकीपटू तयार केले, ज्यांनी आपल्या वळण घेणाऱ्या चेंडूंनी भल्याभल्या फलंदाजांची भंबेरी उडवली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आजवर सर्वाधिक बळी घेणारा मुथय्या मुरलीधरन हा श्रीलंकेचाच खेळाडू. मुरलीधरननंतर रंगना हेराथने ही परंपरा पुढे चालू ठेवली. सध्या अकिला धनंजय आणि वानिंदु हसरंगा हे देखील जागतिक क्रिकेटमध्ये आपली छाप पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. यादरम्यान श्रीलंकेने एक असा फिरकीपटू जगाला दिला जो खऱ्या अर्थाने ‘मिस्ट्री स्पिनर’ होता. त्याचे चेंडू भल्याभल्यांना चकवत यष्ट्यांचा वेध घेत. टी२० क्रिकेटच्या जमान्यात फलंदाज गोलंदाजांना वरचढ ठरत असताना ‘कॅरम बॉल’ सारखे अस्त्र फिरकी गोलंदाजांना देणारा हा फिरकीपटू म्हणजे अजंथा मेंडिस.
अजंथा मेंडिसचे नाव आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सात ते आठ वर्ष राहिले. या काळात त्याच्या कॅरम बॉल व मिस्ट्री स्पिनची खूप चर्चा झाली. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक नावाजलेला खेळाडू बनण्यापर्यंत त्याचा प्रवास काहीसा मनोरंजक होता.
कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्यासाठी तो सेनेत दाखल झाला
पाच भावंडांच्या कुटुंबात त्याचा क्रमांक तिसरा. आपल्या गावच्या शाळेत खेळाच्या सुविधा नसल्याने त्याने २००० मध्ये मोरातुवा कोचींग क्लबमध्ये जाण्यास सुरुवात केली. खरंतर, त्याच्यामधील प्रतिभा १९९८ मध्ये लकी रॉजर्स नावाच्या एका प्रशिक्षकाने ओळखली होती आणि त्याला मोरातुवा येथे येण्यास आमंत्रित केले. लवकर त्याला शाळेच्या १५ वर्षाखालील संघाचा कर्णधार नियुक्त करण्यात आले. आपल्या फिरकीची जादू दाखवताना त्याने अतिशय वेगाने वरच्या पायऱ्या चढण्यास सुरुवात केली.
सन २००३-२००४ च्या हंगामावेळी त्याच्या आयुष्याला एक वेगळे वळण लागले. आपल्या शालेय संघाकडून खेळत असताना श्रीलंकन आर्टीलरी संघाविरुद्ध खेळत असताना त्याने जबरदस्त कामगिरी केली. त्या सामन्याला उपस्थित असलेल्या श्रीलंका आर्टिलरी क्रिकेट कमिटीच्या अधिकाऱ्यांनी त्याला आपल्या संघाकडून खेळण्याचा प्रस्ताव दिला. काही दिवसांपूर्वीच वडिलांचे निधन झाले असल्याने व कुटुंबाला काहीतरी हातभार लावावा, या अपेक्षेने अजंथाने श्रीलंका आर्टिलरी संघाकडून खेळण्याचे मान्य केले. सुरुवातीचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्याला गनर म्हणून पद देण्यात आले.
देशांतर्गत क्रिकेट गाजवत केले आंतरराष्ट्रीय पदार्पण
अजंथाने २००५ पासून श्रीलंकेचे देशांतर्गत क्रिकेट गाजवायला सुरुवात केली. २३ लिस्ट ए सामन्यात ५९ बळी घेत त्याने चर्चा लुटली.२००६-२००७, २००७-२००८ या दोन वर्षात त्याने अक्षरशः बळींच्या रतीब घातला. ९ प्रथमश्रेणी सामन्यात ६८ बळी मिळवण्याची विक्रमी कामगिरी केल्यानंतर राष्ट्रीय संघाचे दरवाजे त्याच्यासाठी खुले झाले.
अजंथाला एप्रिल २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळाली. मात्र, त्याच्या नावाची खरी ओळख सर्वांना झाली ती त्यावर्षीच्या आशिया कपमध्ये. स्पर्धेतील सहा सामन्यात १७ बळी मिळवत त्याने मालिकावीराचा पुरस्कार मिळवला. आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात तर, त्याने अक्षरशः कहर केला. अंतिम सामन्यात श्रीलंकेने दिलेल्या २७४ धावांचा पाठलाग करताना भारताने ९ षटकात १ बाद ७६ अशी दमदार सुरुवात केली होती. मात्र, त्यानंतर अजंथाने अवघ्या १३ धावांत आपल्या कॅरम बॉलने ६ बळी मिळवून श्रीलंकेला आशिया चषकाचे विजेतेपद मिळवून दिले.
त्यानंतर दोन आठवड्यांनी त्याने भारताविरुद्धच कसोटी पदार्पण करताना आठ बळी आपल्या नावे केले. २००८ आशिया कप अंतिम सामन्यातील कामगिरीनंतर त्याला श्रीलंका आर्टिलरीमध्ये सार्जंट पदावरून थेट सेकंड लेफ्टनंट अशी पदोन्नती देण्यात आली होती.
मिस्ट्री उलगडली आणि…
पुढे, अनेकांनी त्याच्या फिरकीची मिस्ट्री सोडवली आणि त्याचा फिरकीचा प्रभाव कमी होऊ लागला. नाही म्हणायला तो कधीतरी एखादी-दुसरी चांगली कामगिरी करत. दरम्यानच्या काळात त्याने वनडे क्रिकेटमध्ये अजित आगरकरचा सर्वात वेगवान ५० बळी घेण्याचा विक्रम आपल्या नावे केला. २०१४ मध्ये झालेल्या पाठीच्या दुखापतीमुळे त्याच्या कारकीर्दीला चांगलाच ब्रेक लागला. पुढे वर्षभरानंतर त्याने टी२० क्रिकेटमधून पुनरागमन केले. मात्र, जुना अजंथा मेंडिस अभावानेच पाहायला मिळाला. काही वर्ष व्यावसायिक टी२० लीग खेळल्यानंतर २०२० मध्ये त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटला रामराम ठोकला.
एकेकाळी मुथय्या मुरलीधरनचा वारसदार, मिस्ट्री स्पिनर, कॅरम बॉलचा जनक अशी अनेक बिरुदे मिरवणाऱ्या मेंडिसच्या कधी म्हणावे तसे उड्डाण केले नाही. दुखापत आणि सातत्य कायमच सोबत न राहिल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट एका उमद्या फिरकीपटूच्या कौशल्याला निरंतर पाहण्यास मुकले.
महत्वाच्या बातम्या:
आयपीएल सुरू होण्यापूर्वीच आरसीबीला मोठा धक्का! या खेळाडूने घेतली संपूर्ण स्पर्धेतून माघार
रिषभ पंत नव्हे तर, या खेळाडूला पहिल्या टी२० सामन्यात कोहली देणार यष्टीरक्षक म्हणून संधी
आयसीसी मधील भारतीय अधिकाऱ्यावर गंभीर आरोप, निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता