भारतीय महिला हॉकी संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. तिथे पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार असून त्यातील सलग तीन सामने भारतीय संघ हरला. बुधवार दिनांक १७ रोजी झालेल्या तिसऱ्या सामन्यातही भारतीय महिला संघ २-३ असा पराभूत झाला आणि कसोटी मालिका गमावली.
सामन्याची सुरुवात भारतीयांच्या मनासारखी झाली, दीप इक्का हिने सुंदर चाल रचत न्यूझीलंडच्या कक्षेत प्रवेश केला आणि तिने मारलेला फटका न्यूझीलंडच्या बचावपटूंनी अवैधरित्या हाताळल्यामुळे भारतीयांना पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि ९ व्या मिनिटाला भारताच्या दीप इक्का हिने त्याचे गोल मध्ये रूपांतर केले. पण हा आनंद खूप वेळ टिकला नाही आणि न्यूझीलंडने प्रतिआक्रमणे चालू केली त्याचा फायदा त्यांना मिळाला आणि त्यांनीही पेनल्टी कॉर्नर मिळवला आणि १३ व्या मिनिटाला स्कोर लाइन १-१ अशी बरोबरीत आणली. आक्रमणात भारतीय बचाव ढळला आणि त्याने१५व्या मिनिटाला आणखी एक गोल करत सामन्यांमध्ये आघाडी घेतली आणि ३९ व्या मिनिटाला कर्णधार शिलोन ग्लोयनने आणखी एक गोल करत बढत वाढवली. त्यानंतर सुंदर बचावात्मक खेळाचे प्रदर्शन करत भारतीयांची आक्रमणे थोपवले, सामन्याच्या अंतिम सत्रात भारताच्या मोनिकाने एक मैदानी गोल नोंदवत स्कोर लाइन २-३ अशी केली पण खूप उशीर झाला होता. न्यूझीलंडने हा सामना २-३ च्या फरकाने जिंकला आणि मालिकेत विजयी ३-० ची बढत मिळवली.
भारतीय महिला संघाने पहिला सामना १-४ ने गमावला होता तर दुसऱ्या सामन्यात २-८ असा मानहानीकारक पराभव स्वीकारला होता. भारतीय महिला संघाचा आजचा खेळ चांगला झाला असून त्यांनी उत्तम मैदानी खेळाचे प्रदर्शन करत लॉन्ग पासेस आणि उत्तम क्रॉस पासेसचे प्रदर्शन करत आक्रमणे रचली पण त्यांना यश आले नाही. न्यूझीलंडचा महिलांचा संघ जागतीक क्रमवारीत ५ व्या स्थानावर आहे तर भारतीय महिला संघ हा १२ व्या स्थानावर आहे.