---Advertisement---

…म्हणून न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका टेस्ट चॅम्पियनशीपचा भाग नाही!

On: गुरूवार, नोव्हेंबर 28, 2019 4:45 PM
---Advertisement---

कसोटी क्रिकेट जिवंत आणि मनोरंजक ठेवण्यासाठी आयसीसीने कसोटी चॅम्पियनशीपची स्पर्धेची सुरुवात केली आहे. या स्पर्धेतील आता सर्व संघांचे सामने सुरु झाले आहेत. आयसीसीचा कसोटी दर्जा असणाऱ्या 12 देशांपैकी 9 देशांच्या संघात ही स्पर्धा होत आहे. या स्पर्धेत सध्या भारतीय संघ 360 गुणांसह गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर आहे.

मात्र सध्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात न्यूझीलंडमध्ये कसोटी मालिका सुरू आहे, पण ही मालिका कसोटी चॅम्पियनशीपचा भाग नसल्याने सर्वांना आश्चर्य वाटले आहे. पण यामागे कसोटी चँम्पियनशीपचाच एक नियम आहे.

तो असा की 2 वर्षे चालणाऱ्या या कसोटी चॅम्पियनशीपमध्ये सहभागी 9 संघांना प्रत्येकी 8 प्रतिस्पर्ध्यांपैकी 6 संघांविरुद्ध कसोटी मालिका खेळाव्या लागणार आहे. यामध्ये तीन मालिका घरच्या मैदानावर तर तीन मालिका परदेशात खेळायच्या आहेत.

त्यानुसार इंग्लंड दक्षिण आफ्रिकेत डिसेंबर 2019 मध्ये चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर इंग्लंड श्रीलंकेत मार्च 2020मध्ये 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे आणि भारतात जानेवारी 2021 मध्ये 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यामुळे इंग्लंडच्या परदेशातील या 3 कसोटी मालिका कसोटी चॅम्पियनशीपचा भाग आहेत.

तसेच न्यूझीलंड मायदेशात फेब्रुवारी 2020मध्ये भारताविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यानंतर न्यूझीलंड मायदेशात नोव्हेंबर-डिसेंबर 2020मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मलिका खेळणार आहे आणि डिसेंबर 2020मध्ये पाकिस्तान विरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळेल.

त्यामुळे न्यूझीलंडच्या मायदेशातील या 3 कसोटी मालिका कसोटी चॅम्पियनशीपचा भाग आहेत.

याच कारणामुळे इंग्लंडच्या न्यूझीलंड दौऱ्यातील सध्या सुरु असलेल्या कसोटी मालिकेचा कसोटी चॅम्पियनशीपमध्ये समावेश नाही. ही गोष्ट इंग्लंडच्या फायद्याची ठरली आहे. कारण न्यूझीलंड विरुद्ध त्यांनी पहिल्या कसोटीमध्ये पराभव स्विकारला आहे.

या कसोटी चॅम्पियनशीप यावर्षी ऑगस्टपासून इंग्लड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऍशेस मालिकेने सुरुवात झाली आहे. ही ऍशेस मालिका इंग्लंडमध्ये खेळली गेली असल्याने इंग्लंडच्या कसोटी चॅम्पियनशीपच्या मायदेशातील अजून 2 कसोटी मालिका बाकी आहेत.

या कसोटी चॅम्पियनशिपमध्ये साखळी फेरीनंतर ज्या दोन संघांचे सर्वाधिक गुण असतील त्या दोन संघात जून 2021 मध्ये लॉर्ड्सवर अंतिम सामना पार पडणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---