न्यूझीलंड विरूद्ध वेस्ट इंडिजच्या कसोटी मालिकेतील दुसर्या सामन्याला आज (११ डिसेंबर) वेलिंग्टन येथे सुरुवात झाली. पहिल्या दिवशी न्यूझीलंडच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद २९४ अशी धावसंख्या उभारली. न्यूझीलंडचा मधल्या फळीतील फलंदाज हेन्री निकोल्सने झळकाविलेले शतक आजच्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले. आजचा खेळ संपला तेव्हा निकोल्स ११७ धावांवर आणि कायले जेमिसन १ धावांवर नाबाद आहेत.
न्यूझीलंडच्या डावाची अडखळत सुरुवात
दुसर्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरने नाणेफेक जिंकून यजमानांना फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पहिल्या सत्रात ७८ धावांवर ३ गडी बाद करत वेस्ट इंडिजने चांगली सुरुवात केली होती. या सामन्यात न्यूझीलंडचा नियमित कर्णधार केन विलियम्सन पालकत्व रजेमुळे खेळत नाही आहे. त्याच्या जागी कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या टॉम लॅथमने सलामीला येत २७ धावांची खेळी खेळली. टॉम ब्लंडेल १४ आणि रॉस टेलर अवघ्या ९ धावांवर तंबूत परतले.
पाचव्या क्रमांकावरील निकोल्सने डाव सावरला
न्यूझीलंडच्या अडखळत्या सुरुवातीनंतर पाचव्या क्रमांकावर आलेल्या हेन्री निकोल्सने खेळपट्टीवर नांगर टाकत डाव सावरण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. त्याने विल यंगला साथीला घेत आणखी पडझड होणार नाही, याची काळजी घेतली. या दोघांनी चौथ्या गड्यासाठी ७० धावांची भागीदारी केली. यंग बाद झाल्यानंतर बीजे वॉटलिंगने ३० तर डॅरेल मिचेलने ४२ धावा करत निकोल्सला साथ दिली. निकोल्सने शैलीदार फलंदाजी करत २०७ चेंडूत १५ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ११७ धावांची खेळी साकारली. पहिल्या डावात न्यूझीलंडला मोठी धावसंख्या उभारण्यासाठी हेन्री निकोल्सने शतकी खेळीचे मोठ्या खेळीत रूपांतर करण्याची आवश्यकता असेल.
Henry Nicholls shines on the opening day of the Wellington Test with an unbeaten century 👏
For West Indies, Shannon Gabriel finishes the day with three wickets.#NZvWI scorecard 👉 https://t.co/lhMysPsQlx pic.twitter.com/JvOAjP7b4p
— ICC (@ICC) December 11, 2020
वेस्ट इंडिज गोलंदाजांची संमिश्र कामगिरी
पहिल्या सत्रात न्यूझीलंडचे ३ गडी बाद करत वेस्ट इंडिजने चांगली सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर नियमित अंतराने बळी पटकाविण्यात त्यांना यश आले नाही. वेस्ट इंडिजकडून शेनॉन गेब्रियलने सर्वाधिक ३ गडी बाद केले, तर अल्झारी जोसेफने २ बळींची कमाई केली. सामन्यात टिकून राहण्यासाठी दुसर्या दिवशी वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना न्यूझीलंडचा डाव झटपट गुंडाळावा लागेल.
संक्षिप्त धावफलक:
न्यूझीलंड – २९४/६
(हेन्री निकोल्स ११७*, विल यंग ४३, शेनॉन गेब्रियल ३/५७)
संबंधित बातम्या:
– पहिल्या कसोटीत न्यूझीलंडचा वेस्ट इंडिजवर मोठा विजय, हा खेळाडू ठरला सामनावीर
– INDvsAUS: दुसऱ्या सराव सामन्यात विराट- पुजारा यांच्या अनुपस्थितीमुळे भारताची अवस्था दयनीय
– खुशखबर! हा संघ करणार दक्षिण अफ्रिकेचा दौरा, बॉक्सिंग डे कसोटीने होणार दौऱ्याला सुरुवात