क्विंन्सटाऊन। भारतीय महिला क्रिकेट संघ (India women Cricket Team) सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय महिला संघ आणि न्यूझीलंड महिला (India Women vs New Zealand Women) संघात सध्या ५ सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा सामना शुक्रवारी (१८ फेब्रुवारी) जॉन डेव्हिस ओव्हल मैदानावर पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडने ३ विकेट्सने विजय मिळवला आणि मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
या सामन्यात भारताने ४९.३ षटकात सर्वबाद २७९ धावा केल्या होत्या आणि न्यूझीलंडला २८० धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान न्यूझीलंडने ७ विकेट्स गमावत ४९.१ षटकात सहज पूर्ण केले. न्यूझीलंडकडून लॉरेन डाऊन, एमिलिया केर आणि एमी सदरवेट यांनी अर्धशतके करत विजयात मोलाचे योगदान दिले. ५२ चेंडूत नाबाद ६४ धावांची खेळी करणाऱ्या लॉरेन डाऊनला (Lauren Down) सामनावीर पुरस्कार देण्यात आला. ती न्यूझीलंडकडून ६ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आली होती. तिने आपल्या खेळीत ६ चौकार आणि २ षटकार मारले.
न्यूझीलंडचा अखेरच्या षटकात विजय
भारताने दिलेल्या २८० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंड संघाची सुरुवात खराब झाली. पहिल्या तीन षटकात न्यूझीलंडने कर्णधार सोफी डिवाईन आणि सुझी बेट्स यांच्या विकेट्स गमावल्या होत्या. डिवाईन तर शुन्यावर माघारी परतली होती.
मात्र, त्यानंतर एमिलिया केर आणि एमी सदरवेट यांनी शतकी भागीदारी रचली. या दोघींनाही खेळपट्टीवर टिकून खेळत वैयक्तिक अर्धशतकेही झळकावली. अखेर दोघींची १०३ धावांची भागीदारी झाली असताना झुलन गोस्वामीने सदरवेटची विकेट घेतली. तिचा झेल मिताली राजने घेतला. त्यामुळे त्यांची भागीदारी तुटली. सदरवेटने ७६ चेंडूत ५९ धावा केल्या. तिच्यानंतर काहीवेळात एमिलिया देखील स्नेह राणाच्या गोलंदाजीवर बाद झाली. तिने ८० चेंडूत ६७ धावा केल्या.
यानंतरही मॅडी ग्रीन आणि ली तुहूहू यांच्या झटपट विकेट गेल्या. त्यामुळे न्यूझीलंड संघ दबावात आला होता. मात्र, नंतर डाऊनने आक्रमक खेळ करत न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. तिने केटी मार्टिनबरोबर ७ व्या विकेटसाठी ७६ धावांची भागीदारी रचली. तसेच ८ व्या विकेटसाठी फ्रान्सेस मॅके हिच्याबरोबर नाबाद ३३ धावांची भागीदारी केली. त्यामुळे न्यूझीलंडने हा सामना सहज जिंकला.
भारताकडून झुलन गोस्वामीने शानदार गोलंदाजी केली. तिने ४७ धावांत ३ विकेट्स घेतल्या. तसेच रेणूका सिंग, एकता बिश्त, दिप्ती शर्मा आणि स्नेह राणाने प्रत्येकी १ विकेट घेतली.
भारताकडून तिघींनी केली अर्धशतके
या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने दमदार सुरुवात केली होती. सलामीला फलंदाजीला आलेल्या सभ्भीनेनी मेघना आणि शेफाली वर्मा या दोघींनी १०० धावांची भागीदारी केली. तसेच दोघींनी वैयक्तिक अर्धशतकेही केली. मेघनाने ४१ चेंडूत ६१ धावांची खेळी केली. या खेळीत तिने ९ चौकार आणि २ षटकार मारले, तर शेफाली वर्माने ५७ चेंडूत ५१ धावांची खेळी केली.
या दोघी बाद झाल्यानंतर भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी नियमित कालांतराने विकेट्स गमावल्या. यास्तिका भाटीया (१९), मिताली राज (२३) आणि हरमनप्रीत कौर (१३) यांना चांगल्या सुरुवातीनंतरही मोठी खेळी करता आली नाही. पण नंतर दिप्ती शर्माने ६९ चेंडूत नाबाद ६९ धावा करत भारताचा डाव सावरला. त्यामुळे भारताला ४९.३ षटकात सर्वबाद २७९ धावा करता आल्या.
न्यूझीलंडकडून हनाह रोव आणि रोझमेरी मेअर यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर, अन्य ४ गोलंदाजांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
केव्हा, कुठे आणि कधी पाहू शकाल भारत- वेस्ट इंडिज दुसरा टी२० सामना? जाणून घ्या सर्वकाही
व्यंकटेश अय्यरमुळे ‘या’ खेळाडूला मिळेना संघात स्थान; कर्णधार रोहित म्हणतोय…