हेमिल्टन। न्यूझीलंडमध्ये सध्या सुरू असलेल्या महिला विश्वचषकात गुरुवारी (१० मार्च) भारतीय महिला विरुद्ध न्यूझीलंड महिला संघात सामना पार पडला. या सामन्यात यजमान न्यूझीलंडने भारताला ६२ धावांनी पराभूत केले. एमेलिया केर न्यूझीलंडच्या विजयाची शिल्पकार ठरली. तिने अर्धशतक करण्याबरोबरच तीन विकेट्सही घेतल्या.
या सामन्यात न्यूझीलंडच्या २६१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला ४६.४ षटकात सर्वबाद १९८ धावाच करता आल्या. भारताकडून हरमनप्रीत कौर हिने अर्धशतकी खेळी केली. पण तिला अन्य फलंदाजांकडून अपेक्षित साथ मिळाली नाही.
हरमनप्रीतची एकाकी झुंज
या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर २६१ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. स्म्रीती मंधना ६ धावांवर आणि दिप्ती शर्मा ५ धावांवर बाद झाली. त्यानंतर खेळपट्टीवर स्थिरावलेली यास्तिका भाटिया ही देखील ५९ चेंडूत २८ धावा करून ली ताहुहूच्या गोलंदाजीवर बाद झाली. त्यामुळे भारताने ५० धावांत ३ विकेट्स गमावल्या होत्या.
पण नंतर कर्णधार मिताली राज आणि उपकर्णधार हरमनप्रीत कौर यांच्या जोडीने भारतीय संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघींनी धीम्यागतीने खेळताना धावफलक हलता ठेवला होता. पण या दोघींची जोडी एमेलिया केरने तोडली. तिने ५६ चेंडूत ३१ धावा करणाऱ्या मिताली राजला ३० व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर बाद केले. त्याच्या पुढच्याच चेंडूवर एमेलियाने यष्टीरक्षक फलंदाज ऋचा घोषला बाद करत भारताला ५ वा धक्का दिला.
यानंतर स्नेह राणाने हरमनप्रीत कौरला साथ देण्याचा प्रयत्न केला. पण ती देखील १८ धावा करून बाद झाली. पाठोपाठ पुजा वस्त्राकर ६, झुलन गोस्वामी १५ धावांवर बाद झाल्या. तसेच हरमनप्रीतने देखील ६३ चेंडूत ७१ धावांची खेळी करून विकेट गमावली. तिच्या या खेळीत तिने ६ चौकार आणि २ षटकार मारले. भारताकडून अखेरची विकेट राजेश्वरी गायकवाडच्या रुपात गेली. तिला शुन्यावर हेली जेन्सनने बाद केले. त्यामुळे भारताचा डाव १९८ धावांवरच संपुष्टात आला.
न्यूझीलंडकडून ली ताहुहू आणि एमेलिया केर यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तसेच हेली जेन्सनने २ आणि जेस केर व हन्नाह रोवने प्रत्येकी १ विकेट घेतली.
#TeamNewZealand beat #TeamIndia by 62 runs and register their second win in #CWC22 👏 pic.twitter.com/JyUS1tlNuq
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 10, 2022
स्नेह राणाची गोलंदाजीत कमाल
या सामन्यात भारताची कर्णधार मिताली राजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी केली. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ९ बाद २६० धावा केल्या. न्यूझीलंडकडून एमी सदरवेट आणि एमेलिया केर यांनी अर्धशतके केली. सदरवेटने ७५ धावांची आणि एमेलियाने ५० धावांची खेळी केली. तसेच काते मार्टिनने ४१ धावांचे योगदान दिले, तर सोफी डिवाईनने ३५ धावांची खेळी केली.
भारताकडून स्नेह राणाने गोलंदाजीत दमदार कामगिरी केली. तिने १० षटकांत ३४ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. तसेच राजेश्वरी गायकवाडने २ विकेट्स घेतल्या. तसेच दिप्ती शर्मा आणि झुलन गोस्वामी यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. राणाने क्षेत्ररक्षणातही चमकदार कामगिरी केली. तिने सुझी बेट्सला ५ धावांवर धावबाद केले.
महत्त्वाच्या बातम्या –
सलामीचा फलंदाज असणारा श्रीसंत ‘असा’ झाला वेगवान गोलंदाज
Video: एकदम भन्नाट! पुजा वस्त्राकरच्या जबरदस्त डायरेक्ट थ्रोवर न्यूझीलंडची सुझी बेट्स रनआऊट
‘जॉनी बेयरस्टो आयपीएल खेळतो का?’, इरफान पठाणने असा प्रश्न का विचारला