भारतीय क्रीडा मंत्रालयाने रविवारी (24 डिसेंबर) मोठा निर्णय घेतला. त्यांनी नवनियुक्त भारतीय कुस्ती महासंघ निलंबित केला आहे. यंदा कुस्तीपटूंच्या विरोधानंतर भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना कुस्ती संघटनेच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आले. त्यानंतर निवडणुका झाल्या आणि ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या निकटवर्तीय संजय सिंह यांनी निवडणूक जिंकली. संजय सिंह अध्यक्ष झाल्यानंतर कुस्तीपटू साक्षी मलिक हीने पत्रकार परिषदेत कुस्ती सोडण्याची घोषणा केली होती. तिच्यानंतर बजरंग पुनिया यानी पद्मश्री परत केला. त्याच्याशिवाय हरियाणाचा पॅरा अॅथलीट वीरेंद्र सिंग याने पद्मश्री परत करण्याची घोषणा केली होती.
नियमांचे उल्लंघन केल्यामुळे शासनाने कुस्ती संघाला निलंबित केले आहे. नवनिर्वाचित मंडळाने कुस्तीपटूंना तयारीसाठी सूचना न देता 15 वर्षांखालील आणि 20 वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्याची घाईघाईने घोषणा केली होती. क्रीडा मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, “नवीन संघाने WFI च्या नियमांचे पालन केले नाही. आम्ही फेडरेशन संपुष्टात आणलेले नाही, उलट पुढील आदेश येईपर्यंत निलंबित केले आहे. त्यांना फक्त योग्य प्रक्रिया आणि नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.”
पुढे ते म्हणाले, “ज्या दिवशी संजय सिंह यांची अध्यक्षपदी निवड झाली, त्याच दिवशी डब्ल्यूएफआयचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय कुमार सिंग यांनी घोषणा केली होती की, नंदिनी नगर, गोंडा (यूपी) येथे कुस्तीसाठी 15 वर्षांखालील आणि 20 वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केल्या जातील. ही घोषणा घाईघाईने करण्यात आली. डब्ल्यूएफआय घटनेच्या प्रस्तावनेच्या कलम 3 नुसार, WFI चे उद्दिष्टांचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.” (Newly appointed Wrestling Federation of India suspended by Sports Ministry)
हेही वाचा
बोंबला! IND vs SA पहिल्या कसोटीत पावसाची शक्यता, क्यूरेटरच्या विधानाने वाढू शकतात टीम इंडियाच्या अडचणी
दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियन महिला 261वर All Out, भारतीय रणरागिणी इतिहास घडवण्यापासून ‘एवढ्या’ धावा दूर