भारतीय क्रिकेट संघाचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि हरमनप्रीत कौर यांना क्रीडा क्षेत्रातील मानाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेटमध्ये दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल म्हणून हा सन्मान दिला जात आहे.
रोहित शर्माला हा पुरस्कार त्याच्या यशस्वी नेतृत्वामुळे मिळत आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय पुरुष संघाने दोन मोठी आयसीसी विजेतेपदं पटकावली. भारताने 2024 मध्ये टी-20 वर्ल्ड कप तर 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. टी-20 वर्ल्ड कप विजयानंतर रोहितने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर 2025 मध्ये कसोटी क्रिकेटलाही अलविदा केला. सध्या रोहित केवळ एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताकडून खेळत आहे.
दरम्यान, भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिला मिळालेला पद्मश्री पुरस्कार ऐतिहासिक यशामुळे आहे. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारताने महिला वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचला. अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव केला. हा सामना नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळवण्यात आला होता.
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 299 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. दीप्ती शर्माने पाच विकेट्स घेतल्या, तर शेफाली वर्माने फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात मोलाची भूमिका बजावली. या विजयासह भारताने पहिल्यांदाच महिला वर्ल्ड कप जिंकला.
या यशामुळे हरमनप्रीत कौर घरच्या मैदानावर वर्ल्ड कप जिंकणारी दुसरी भारतीय कर्णधार ठरली. याआधी 2011 मध्ये महेंद्रसिंग धोनीने पुरुष संघाला वर्ल्ड कप जिंकून दिला होता. रोहित शर्मा आणि हरमनप्रीत कौर यांना मिळणारा पद्मश्री सन्मान म्हणजे भारतीय क्रिकेटसाठी मोठा गौरव मानला जात आहे.






