क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच आयोजित झालेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या सामन्यासाठी सर्वप्रथम केन विलियम्सनच्या नेतृत्वातील न्यूझीलंड संघाने पात्रता मिळविली होती. तसेच, १८ जूनपासून सुरू होणाऱ्या या सामन्यापूर्वी न्यूझीलंड संघाला इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्याची संधी मिळाली. या संधीचा न्यूझीलंड संघाने पुरेपूर फायदा उठवत अंतिम सामन्यात भारतापुढे तगडे आव्हान उभे करण्याचे संकेत दिले आहेत.
न्यूझीलंडने गाजवली मालिका
इंग्लंड विरुद्धची छोटेखानी कसोटी मालिका न्यूझीलंड संघासाठी जागतिक कसोटी सामन्यापूर्वी सर्वोत्तम सराव होता. याचा न्यूझीलंडने पूर्ण फायदा करून घेतला. लॉर्ड्सवर झालेल्या पहिल्या कसोटीतून पदार्पण करणाऱ्या डेवॉन कॉनवेने दमदार द्विशतक झळकावले. त्याला मधल्या फळीत हेन्री निकोल्सने उत्तम साथ दिली होती. अनुभवी टिम साऊदी व युवा कायले जेमिसनयांनी प्रभावी गोलंदाजी करत इंग्लंडला निष्प्रभ केले होते.
दुसऱ्या कसोटीत संघ व्यवस्थापनाने तब्बल सहा बदल करत सर्वांना चकित केले. कर्णधार केन विलियम्सन दुखापतीमुळे सामन्यासाठी उपलब्ध नव्हता. मात्र, या सामन्यात संधी मिळालेल्या विल यंग व टॉम ब्लंडल या फलंदाजांनी तर, पुनरागमन करत असलेल्या ट्रेंट बोल्ट, एजाज पटेल व मॅट हेन्री यांनी आपल्या गोलंदाजीने दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडला चौथ्या दिवशीच विजय मिळवून दिला. अनुभवी फलंदाज रॉस टेलर व डावखुरा वेगवान गोलंदाज नील वॅग्नर याने दोन्ही सामन्यात सातत्यपूर्ण कामगिरी केली. दुसऱ्या सामन्यात नेतृत्व केलेल्या टॉम लॅथमने नेतृत्व गुणांची चुणूक दाखवली.
न्यूझीलंड संघाला इंग्लंडमध्ये येऊन जवळपास दीड महिने झाले आहेत. या काळात ते इंग्लिश वातावरणात पूर्णपणे मिसळले असल्याचे जाणवते. याचा फायदा त्यांना भारताविरूद्ध होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात होऊ शकतो.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी न्यूझीलंडची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
डेवॉन कॉनवे, टॉम लॅथम (उपकर्णधार), केन विलियम्सन (कर्णधार), रॉस टेलर, हेन्री निकोल्स, बी जे वॉटलींग, मिचेल सॅंटनर, टिम साऊदी, नील वॅग्नर, मॅट हेन्री व ट्रेंट बोल्ट.
महत्त्वाच्या बातम्या –
“इंग्लंड संघाच्या खराब कामगिरीसाठी टी२० लीग जबाबदार”
हृदयाचा ठोका चुकवणाऱ्या घटनेनंतर फाफ डू प्लेसिसच्या पत्नीने शेअर केली भावूक करणारी पोस्ट
टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्यासाठी ‘हे’ दोघे असणार राहुल द्रविडचे साथीदार